मुंबई, 16 जानेवारी : बऱ्याच जणांना पाळीव प्राणी खूप आवडतात. त्यांचं त्या प्राण्यावर खूप प्रेम असतं. ते अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे त्या प्राण्यांची काळजी घेतात. त्यांना सांभाळतात. अनेकदा प्राणीप्रेमींच्या प्रेमाचे अनोखे किस्से ऐकायला मिळतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. अलीगढ जिल्ह्यात कुत्रा-कुत्रीचं चक्क लग्न लावण्यात आलं. त्या पाळीव कुत्र्यांचं लग्न त्यांच्या मालकांनी लावून दिलं. अलीगढमधल्या सुखरावली गावात एका कुटुंबात टॉमी नावाचा कुत्रा पाळण्यात आला आहे. त्याचं लग्न दुसऱ्या कुटुंबातल्या जेली नावाच्या कुत्रीशी लावून देण्यात आलं. अगदी माणसांच्या लग्नाप्रमाणे या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. वरमाला, सात फेऱ्या आणि लग्नाचं रिसेप्शन असे सगळे विधी झाले. मोठा मांडव बांधून कुत्र्याच्या मालकांनी लग्नाचं आयोजन केलं होतं. सजावट करून डीजे वाजवून वाजतगाजत कुत्र्यांचं लग्न लावून देण्यात आलं. हेही वाचा - चिडलेल्या हत्तीने थेट पिक-अप केला उलटा, Shocking Video पाहून नेटकरी अवाक् सुखरावली गावाचे माजी सरपंच दिनेश चौधरी यांच्या मुलाने काही वर्षांपूर्वी रस्त्यावरचा एक कुत्रा घरी आणला होता. त्याने त्याला घरी पाळलं होतं आणि त्याचा सांभाळ करत होता. घरातल्या सर्वांचं या कुत्र्यावर खूप प्रेम आहे. त्यांनी कुत्र्याचं नाव प्रेमाने टॉमी असं ठेवलं. शेजारच्याच गावात या कुटुंबाच्या ओळखीचे डॉ. रामप्रकाश राहतात. त्यांच्या घरी एक कुत्री आहे. त्या कुत्रीचं नाव जेली आहे. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी चर्चा करून टॉमी आणि जेलीचं लग्न करायचं ठरवलं. त्यानंतर या दोघांच्या लग्नाचं जंगी आयोजन करण्यात आलं.
हा विचित्र विवाह करणारे रायपूर टिकरी इथले दिनेश चौधरी आणि डॉ. रामप्रकाश यांनी सर्वांना सांगितले की, या लग्नामुळे दोन्ही कुटुंबातल्या व व्यक्ती आता नातेवाईक झाले आहेत. हा विवाह संपूर्ण विधिवत पार पडला. त्या वेळी टॉमी आणि जेली यांच्या घरातल्या सदस्यांनी डान्स करून सेलिब्रेशन केलं. आजूबाजूच्या गावांमध्ये या विवाहाची चांगलीच चर्चा आहे.
या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटलंय. काही जणांनी बुवाबाजीमुळे हे कृत्य केलं असल्याचं म्हटलंय. लग्नात कुत्रा-कुत्रीला विधीसाठी एकमेकांच्या शेजारी उभं करून त्यांना वरमाला घालण्यात आल्या. तसंच त्यांना सजवण्यातही आलं होतं. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.