नवी दिल्ली, 4 एप्रिल : कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील रुग्णालयात घुसलेल्या एका भटक्या कुत्र्याच्या तोंडामध्ये नवजात बाळाचा मृतदेह दिसून आलाय. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजूनपर्यंत बाळाच्या आई-वडिलांची ओळख पटलेली नाही. ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने या बाबत वृत्त दिलंय. येथील मॅकगन टिचिंग जिल्हा रुग्णालयात भटक्या कुत्र्यानं नवजात बाळ तोंडात घेऊन इकडेतिकडे धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. 31 मार्च 2023 रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडलीय. 31 मार्चला पहाटे कुत्रा नवजात बाळाला तोंडात घेऊन जात असल्याचं आढळून आलं, मात्र ही घटना रविवारी (2 एप्रिल) उघडकीस आली.
या प्रकरणी एका महिला सुरक्षारक्षकानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटलं आहे की, संबंधित महिला 31 मार्चला सकाळी 6 वाजता कामावर आल्यानंतर तिला काही लोकांनी एक भटका कुत्रा नवजात बाळ तोंडात धरून पळत असून हा कुत्रा रुग्णालयाच्या प्रसूती वॉर्डमधून आल्याचे माहिती दिली. ती जेव्हा प्रसूती वार्ड इमारतीकडे गेली, तेव्हा तिला तेथे कुत्रा बाळाला तोंडात धरून उभा असल्याचं दिसलं. या बाळाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली असता बाळ मृतावस्थेत आढळून आलं. दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर त्याचा मृत्यू नेमका कधी झाला आहे?, तसंच त्याचा जन्म हा अवैध संबंधांतून झाल्यानंतर त्याला रुग्णालयात सोडून दिलं आहे का?, आदी प्रश्न आता निर्माण झाले आहेत. तसंच कुत्र्यानं बाळाला मारलं की नाही, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. डीएनए चाचणी केली जाणार दुसरीकडे, मृत बाळाच्या पालकांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता बाळाच्या डीएनए चाचणीसाठी नमुने लवकरच दावणगिरी येथील एफएसए प्रयोगशाळेत पाठवले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, या बाळाचा जन्म रुग्णालयात झाला नसून, ते बाहेरून कोणीतरी आणून रुग्णालयाच्या आवारात ठेवलं असावं, असा संशय सिम्सचे वैद्यकीय अधीक्षक श्रीधर यांनी व्यक्त केलाय. तपासासाठी तीन पथकं या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश सुरगीहल्ली यांनी सांगितलं की, ‘मृत बाळाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. त्याच्या शरीराचं वजन 900 ग्रॅम होतं. ही प्रसूती अकाली असल्याचा संशय असून, ती मॅकगन हॉस्पिटलमध्ये झाली नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. गेल्या 15 दिवसांत शहरातील सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील सर्व प्रसूतींची माहिती गोळा करून तसा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.’ दरम्यान, या प्रकारानंतर संपूर्ण शिवमोग्गा परिसर हादरला असून, सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

)







