पीयूष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 25 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच लैंगिक अत्याचाराचाही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या बेजबाबदार पणामुळे शवविच्छेदनानंतर मृतदेहाची अदलाबदल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांनी दुसऱ्याचाच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उघडून पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. हा मृतदेह त्यांच्या घरातील व्यक्तीचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा होता. अंत्यसंस्काराच्या वेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुरादाबादजवळील बडा कस्बा येथील परिसरात सोमवारी रात्री उशिरा एका घराचा लिंटर पडले. या दुर्घटनेत कुंवरसेन (वय 45) या व्यक्तीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तर या अपघातात आणखी तीन तरुण जखमी झाले. यानंतर पोलिसांनी कुंवरसेनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह बंद करुन नातेवाईकांना देण्यात आला. यानंतर नातेवाईक तो मृतदेह घरी घेऊन आले. यानंतर मात्र, जेव्हा अंतिम संस्कार करण्याची वेळी आली तेव्हा मृताचा चेहरा पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. हा मृतदेह कुंवरसेनचा नसून दुसऱ्याच कुणाचा तरी निघाला. यानंतर नातेवाईकांनी एकच हंगामा सुरू केला. याबाबतची माहिती पोलीस आणि शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. काही वेळानंतर, कुंवरसेन याचा मृतदेह हा चंदौसी येथील युवकाच्या मृतदेहासोबत बदलला गेला, अशी माहिती समोर आली. दुसरीकडे चंदौसी येथील परिवारानेही जेव्हा घरी जाऊन तो मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनाही मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे लक्षात आले. या सर्व प्रकाराने पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये तैनात असलेले कर्मचारी लोकं कमी असल्याने त्याचा दबावातून हा प्रकार घडल्याचे सांगून याप्रकरणातून बचावात्मक पवित्रा घेताना दिसले. तर याप्रकारानंतर डेप्युटी सीएमओ एसके बेनीवाल म्हणाले की, शवविच्छेदन गृहात दोन मृतदेह असल्याचे मला समजले. या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. यासोबतच मृतदेहाची ओळख शवविच्छेदन गृहात कुटुंबीयांना करून दिली जाते. तसेच नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटवून देण्यात आली. पण काही चुकीमुळे ओळखणाऱ्यांनी हा मृतदेह आमचाच असल्याचे सांगितले आणि नंतर मात्र, हा आमचा मृतदेह नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, नातेवाईकांकडूनच मृतदेह ओळखण्यात चूक झाली आहे. आता दोन्ही मृतदेह त्या-त्या संबंधित परिवाराला सोपविण्यात आले आहे. या सर्व प्रकाराने एकच गोंधळ झालेला दिसला.