नवी दिल्ली, 26 जून : भारतात मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन होतं. आपल्या देशात दुधाची मागणीही जास्त आहे. दिवसेंदिवस ती वाढतेच आहे. त्यातच ए2 दुधाच्या उपयुक्ततेबद्दल जनजागृती होऊ लागल्यामुळे या दुधालाही भरपूर मागणी आहे. त्यामुळे दूध उत्पादनवाढ होण्याच्या दृष्टीने करण्यासाठी संशोधन केलं जातं आहे. एनडीआरआय अर्थात नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने नुकतंच या संदर्भात एक संशोधन केलं. यात संगीताचा दूध उत्पादनावर चांगला परिणाम होत असल्याचं दिसून आलंय. श्रीकृष्णाचं गायी-गुरांसोबत असलेलं नातं आपल्याला माहिती आहे. श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर कानी पडताच गायी-गुरं त्याच्या भोवती गोळा व्हायची. हाच धागा पकडून हरियाणातल्या कर्नाल इथल्या राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेनं एक संशोधन केलं. संगीताचा गायींच्या दुग्धोत्पादनावर परिणाम होतो का हे तपासण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनात समोर आलेल्या निष्कर्षांवरून असा दावा करण्यात आला आहे, की संगीत ऐकल्यामुळे गायी-म्हशींना आरामदायी वाटतं व त्या जास्त दूध देतात. माणसांप्रमाणेच गायी-म्हशींनाही संगीत ऐकायला आवडतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायींना संगीत ऐकायला आवडतं, हे शास्त्रज्ञांनी फार पूर्वी ऐकलं होतं. त्याबाबत प्रयोग केल्यावर समाधानकारक उत्तर मिळालं. गायीच्या मेंदूत संगीतामुळे ऑक्सिटोसिन हॉर्मोन सक्रिय होतो व त्यामुळे तिला दूध देण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. या संशोधनादरम्यान गायींना तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात संगीत ऐकवल्यामुळे गायींच्या वागण्यात बदल झाला. संगीत ऐकल्यामुळे गायींना नेहमीपेक्षा ताणरहित व आरामदायी वाटत असल्याचं निरीक्षण संशोधकांनी केलं. संगीत सुरू झाल्यावर त्या आरामात बसून रवंथ करतात. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला व आधीपेक्षा दुधाचं उत्पादन जास्त झालं. वाचा - चालत्या ट्रेनमध्ये व्यक्तीने मांडलं पाणीपुरीचं दुकान, लोकांनीही मारला ताव गायींना एकाच ठिकाणी बांधून ठेवलं, तर त्यांच्यावरचा ताण वाढतो, असं आढळून आलंय. तसं झाल्यास गायी नीट वागत नाहीत. म्हणूनच संशोधनादरम्यान गायींना चांगली वागणूक देण्यात आली. त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी त्यांना संगीत ऐकवण्यात आलं. आरामदायी वातावरणात त्यांना ठेवलं. त्याचा चांगला परिणाम झाला व दुधाचं उत्पादन वाढलं. गायी-गुरांना चांगलं संगीत ऐकवण्यात आलं, तर त्यांच्या दुधाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, असा निष्कर्ष या संशोधनात काढण्यात आलाय. याचा दुग्धोत्पादनासंदर्भात मोठा फायदा होऊ शकतो. संगीतामुळे माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही अनेक फायदे होऊ शकतात. त्यापैकी हा एक महत्त्वाचा फायदा म्हणावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.