मुंबई, 18 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. यामध्ये पोलीस जीवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावताना दिसत आहेत. या पोलिसांसाठी 23 वर्षाच्या तरुणानं अनोखी छत्री तयार केली आहे. कोरोनाच्या काळात रात्रंदिवस आणि ऊन-पावसात काम करण्यासाठी सज्ज असणाऱ्या पोलिसांसाठी या तरुणानं एक अनोखी छत्री तयार केली आहे. या छत्रीमध्ये पंखा, लाईट आणि मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा देण्यात आली आहे. अहमदबादमधील जुहापुरा मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 23 वर्षांच्या आबिद मंसूरी यांनी एका नॉर्मल छत्रीचं सोलर छत्रीमध्ये रुपांतर केलं आहे. अहमदाबाद पोलिसांची मदत करण्यासाठी त्यांनी या मोठ्या छत्रीला छोटे सोलार पॅनल लावले आहेत. दिवसभर सूर्यापासून या प्लेट उष्णता खेचतात आणि त्यातून ऊर्जा तयार होते. द्वारे छत्रीत चार्जिंग, लाईट आणि पंखा चालवला जाऊ शकतो.
ट्वीटर यूझर कुमार मनीष यांनी ट्वीटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी या उपक्रमासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिल्यानंतर 23 वर्षीय तरुणाचं तुफान कौतुक होत आहे. त्यांच्या ट्विटला 3 हजारहून अधिक लाईक्स 800 हून अधिक रिट्विट करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरचा धोका पोलिसांनाही आहे. कोरोनाची लागण पोलीस दलात होत असल्यानं पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्धा पोलिसांसाठी या तरुणानं अनोख्या पद्धतीनं मदत केली आहे. सोशल मीडियावर अनेक युझर्सनी तरुणाचं कौतुक केलं आहे. संपादन- क्रांती कानेटकर