मुंबई, 23 मार्च : कोरोनाच्या विळख्यात जगभारतील शंभरहून अधिक देश सापडले आहेत. भारतात जवळपास 396 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 89 जण असल्याची माहिती मिळत आहे. मागच्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वेगानं वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली असतानाही काही जणांनी हे आवाहन पायदळी तुडवत बाहेर फिरत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी आदेश काढला असतानाही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या तरुणालाही ट्राफिक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ नीट पाहा, तरुणाला तंबाखूची तलफ आल्यानं तो घराबाहेर पडला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकीकडे नागरिकांसह प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना अशा प्रकारची कारण सांगून हा तरुण बाहेर फिरत होता. या तरुणाला वाहतूक पोलिसांनी दांड्यानं फटके देऊन घरी जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युझर्सनी पोलिसांनी दिलेल्या शिक्षेचं समर्थन केलं आहे. सरकारचे आदेश न पाळणाऱ्यांना अशीच शिक्षा व्हायला हवी असं एका युझरनं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचा दावा केला जात आहे मात्र न्यूज 18 लोकमत या दाव्याची कोणतीही पुष्टी करत नाही.