नवी दिल्ली 09 जानेवारी : सध्या ऑनलाइन शॉपिंगचं युग आहे. आजकाल प्रत्येकजण आपल्या घरी बसून छोटी-मोठी वस्तू ऑर्डर करण्याला प्राधान्य देतो. या कारणामुळे कधीकधी आपल्याला अतिशय किरकोळ आणि कमी किमतीच्या वस्तू चढ्या किमतीत विकल्या जातात. विशेष म्हणजे काहीजण जास्त किंमत देऊन या वस्तू विकतही घेतात. अशा वस्तूंच्या विक्रीमध्ये ई-कॉमर्स कंपन्या सक्रिय सहभाग घेत आहेत. लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग कंपनी असलेल्या अॅमेझॉनवर असा अनेक कमी किमतीच्या शुल्लक वस्तू जास्त किमतीला विकल्या जात आहेत. सध्या अशाच एका वस्तूचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
नुकताच इन्स्टाग्रामवर एका यूजरनं असा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे की त्यामुळे नेटिझन्सची विचार करण्याची पद्धतच बदलून गेली आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की, जेव्हा आपण नारळ विकत घेतो तेव्हा त्याचा फक्त आतील भाग वापरला जातो. त्याची करवंटी कचऱ्यात टाकली जाते. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण मोलाची वस्तू कचऱ्यात फेकली. या चुकीचा पश्चात्तापही होईल.
ओला कचरा सुका कचराच नाही तर या गोष्टींसाठी ही असतो वेगळा डस्टबिन?
इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली नारळाची करवंटी
नारळाचा वरचा भाग फार टणक असतो. या भागाला करवंटी असं म्हटलं जातं. नारळ फोडल्यानंतर ही करवंटी आपण सुका कचरा समजून डस्टबिनमध्ये फेकून देतो. मात्र, ज्या करंवटीला आपण कचरा समजत आहोत ती आपल्यासाठी उत्पन्नाचा स्रोत बनू शकते. एका युजरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे की, 'अॅमेझॉनवर नारळाची करवंटी विकली जाते, याबाबत माहीत नव्हतं. नाहीतर यातून कोट्यवधी रुपयांची कमाई झाली असती.' या युजरनं ही पोस्ट विनोदाचा भाग म्हणून केली असली तरी लोक आता याबाबत गंभीर झाले आहेत. नेटिझन्सनी नारळाच्या करवंटीचे अनेक फायदे समोर मांडले आहेत.
View this post on Instagram
अॅमेझॉनवर तीन हजार रुपयांना विकली जाते नारळाची करवंटी
व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, अॅमेझॉनवर अर्ध्या नारळाची स्वच्छ केलेली करवंटी एक हजार 365 रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे ही डिस्काउंट प्राईस आहे. नाहीतर करवंटीची मूळ किंमत तीन हजार रुपये दाखवण्यात आली आहे. जेव्हा लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना नक्कीच आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्यांनी नारळाच्या कठीण आवरणाचे हजारो फायदे सांगितले. उदाहरणार्थ, त्यात अन्न शिजवलं जाऊ शकतं, भांडं आणि बर्ड फीडर म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. पुढच्या वेळी नारळाची करवंटी फेकण्यापूर्वी तुम्हीही या बाबी लक्षात ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online shopping