नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे रात्री तीन वाजता कारनं घरी परतत असलेल्या दाम्पत्याच्या कारला एका दुचाकीनं धडक दिली. यानंतर, दुचाकी चालकानं गाडी उचलण्याऐवजी कारच्या ड्रायव्हिंगसाईडला येऊन कार चालवणाऱ्या व्यक्तीला गाडीतून खाली उतरण्यास सांगितलं. पण कारचालक गाडीतून खाली उतरत नसल्यानं अखेर दुचाकीचालक कारसमोर उभा राहिला. त्यामुळे कारचालकानं त्याची कार मागे घेण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना कारच्या डॅशबोर्डमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झालीय. या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वार चुकीच्या बाजूनं येऊन कारला स्वतःहून धडकल्याचं स्पष्ट दिसत आहे.
सिटिझन्स मूव्हमेंट, ईस्ट बेंगळुरूनं त्यांच्या ट्विटर हँडलवर या भीषण घटनेचा व्हिडिओ शेअर केलाय. पोस्टमध्ये त्यांनी बेंगळुरू शहर पोलिसांनासुद्धा टॅग केलंय. सिटिझन मूव्हमेंटनं त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'आज पहाटे तीन वाजता सर्जापूर रोडवरील सोफा-मोरेजवळ एक भयानक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कारला मुद्दाम धडक दिली. या कारमध्ये दाम्पत्य प्रवास करत होतं. दुचाकीस्वारांनी चिक्कनायकनहळ्ळी येथील सोसायटीपर्यंत 5 किलोमीटर कारचा पाठलाग केला. त्यामुळे रात्री कारचा दरवाजा उघडू नका, डॅश कॅम वापरा.'
Horrific incident reported on Sarjapur road near Sofas & More around 3 am today. Miscreant riders collided purposefully to a couple traveling in car. They chased the car for 5km till their society in Chikkanayakanahalli. Don't open your car in night. Use dash cam. @BlrCityPolice. pic.twitter.com/4QVYtBZ67B
— Citizens Movement, East Bengaluru (@east_bengaluru) January 29, 2023
या ट्विटला उत्तर देताना बंगळुरू पोलिसांनी लिहिलं की, ‘पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तपास सुरू केलाय.’ पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलं की, 'तुमचं ट्विट बेल्लांडुरु बीसीपी @bellandurubcp ला पुढील तपासासाठी पाठवण्यात आलं आहे.' तर, दुसरीकडे या ट्विटवर अनेक कमेंट येऊ लागल्या आहेत. ट्विटच्या कमेंट बॉक्समध्ये मिथिलेश कुमार या युजरनं लिहिलं की, 'सर्जापूर रोडवर ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. या साठी मुख्य कारण म्हणजे या रस्त्यावरील पथदिवे चालू नसतात, आणि पोलिसांची गस्त खूप कमी झाली आहे. @ArvindLBJP सर, कृपया पथदिव्यांसाठी @BBMPCOMM समन्वय साधा.’
दरम्यान, रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या कारला दुचाकीनं धडक द्यायची, व कारचालकाला दमदाटी करून त्याच्याकडून पैसे उकळायचे, अशा स्वरुपाची गुन्हेगारी वाढू नये, यासाठी पोलिसांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच बेंगळुरू येथे कारमधून चाललेल्या दाम्पत्याच्या बाबतीत असा प्रकार घडल्यामुळे आता कारला मुद्दाम धडक देऊन कारचालकाला त्रास देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी कोणती भूमिका घेतात? कारचालकाला त्रास देणाऱ्या दुचाकीस्वारांचा शोध घेण्यात यशस्वी होतात का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bengaluru, Karnataka, Shocking, Top trending, Videos viral, Viral news