बुंदेलखंड, 27 मे : शुक्रवारी एका पालकांनी मुलाला घेऊन बुंदेलखंड मेडिकल कॉलेज गाठले. त्यांचा मुलगा हा 12 वर्षांचा होता, जो एका विचित्र आजाराने ग्रस्त होता. त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा दीड वर्षांचा असल्यापासून तो काळ्या रंगाची लघवी करीत आहे. त्यांनी यावर अनेक उपचार केले परंतु त्यात कोणतेही निदान झाले नाही. मुलाचा केस स्टडी केल्यानंतर, त्याला बीएमसीच्या बायोकेमिस्ट्री विभागाचे प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. सुमित रावत यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी या मुलाच्या लघवीच्या नमुन्याची पॅथॉलॉजिकल चाचणी केली असता, तो अल्काप्टोन्युरिया या दुर्मिळ आणि अनुवांशिक आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. ज्याचे मुख्य कारण म्हणजे आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढणे. डॉ. सुमित रावत यांनी सांगितले की, गेल्या 13 वर्षांतील त्यांच्याकडे आलेली अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. हा आजार अनुवांशिक असून लाखो मुलांपैकी केवळ एका दोघांनाच असतो. याआधी डॉ. रावत यांच्याकडे 2010 मध्ये अशा प्रकारचे पहिले प्रकरण आले होते. डॉ. रावत यांनी सांगितले की, “हा आजार प्रामुख्याने मुलांच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढल्यामुळे होतो. ही तीच मुले आहेत ज्यांचे पालक मध्यम किंवा सामान्य कुटुंबातून येतात. या स्थितीत ते त्यांना अंडी, मासे आणि चीज यांसारखे पदार्थ अधिक प्रमाणात खायला देतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात एन्झाइमची कमतरता निर्माण होते. यामुळे मुलं जन्मानंतर आयुष्यभर काळ्या रंगाची लघवी करते.
या आजाराचे काही दुष्परिणाम देखील असून यामुळे मुलांचे सांधे दुखू लागतात आणि किडनीवरही परिणाम होतो. डॉ रावत यांच्या मते हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण आहारात सुधारणा करून त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते. यासाठी प्रथिनांचा मुख्य स्त्रोत असलेल्या अंडी, मासे, चीज, दूध इत्यादी खाद्यपदार्थ मुलांच्या आहारातून कमी करावे लागतील. ज्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलाच्या लघवीचा रंग तपकिरी किंवा काळा आहे असे वाटत असेल अशांना पॅथॉलॉजी लॅबमधून फेरिक क्लोराईडची चाचणी करून घेता येईल. ही चाचणी केवळ 200-300 रुपयांमध्ये होते. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करावेत.

)







