नवी दिल्ली, 25 एप्रिल : आजकाल प्रत्येकाजवळ स्मार्टफोन असतो. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात फोन दिसतात. फोनचा वापर वाढला आहे, पण त्याचबरोबर फोनमुळे घडणाऱ्या वाईट घटनाही वाढल्याचं दिसतंय. फोन ब्लास्ट होणं, हा त्यातलाच एक प्रकार. आपल्याला अनेकदा फोनमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकिवात येत असतात. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. या घटनेत आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. केरळ राज्यातील त्रिशूरमध्ये एका विचित्र अपघातात मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाला. माजी ब्लॉक पंचायत सदस्य अशोक कुमार यांची आठ वर्षीय मुलगी आदित्यश्री हिचा थिरुविलवामला येथील पट्टीपरंब मरियम्मन मंदिराजवळील कुन्नाथ हाउसमध्ये मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
मुलगी व्हिडिओ पाहत असताना मोबाईलचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. आदित्यश्री तिरुविलवामाला पुनरजानी येथील क्रेस्ट न्यू लाईफ स्कूलमध्ये इयत्ता 3 ची विद्यार्थिनी होती. तिची आई सौम्या तिरुविलवामाला सर्व्हिस कोऑपरेटिव्ह बँकेत डायरेक्टर आहे. पाळायन्नूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आवश्यक ती कारवाई केली आहे. सविस्तर फॉरेन्सिक तपासणीनंतर या घटनेबद्दल अधिक माहिती मिळेल. दरम्यान, फोन ब्लास्ट होण्याची ही पहिलीच घटना नाही. या पूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशमध्येही अशीच घटना घडली होती. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील कैलासनगर इथं राहणाऱ्या अर्जुन पवार या तरुणाच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला होता, त्यामुळे तो तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मांडीला आणि दोन्ही पायांना जखमा झाल्या होत्या. मित्राशी गप्पा मारत असताना या तरुणाच्या पँटच्या खिशातून धूर निघू लागला. त्याला काही समजण्यापूर्वीच खिशात मोबाईलचा स्फोट होऊन मोबाईल खाली पडला होता. या पूर्वी 12 वर्षांचा एक मुलगा मोबाईलचा स्फोट झाल्याने जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं. हेही वाचा - चोरांनी अडवताच रात्रीच्या अंधारात प्रियकराने केलं असं काही…प्रेयसीला बसला धक्का, Video व्हायरल बऱ्याचदा फोन ओव्हरहिट झाल्याने ब्लास्ट होण्याची शक्यता बळावते. फोन सारखा गरम होत असेल किंवा तो चार्जिंगला लावला असेल व त्याचा वापर केला जात असेल तरीही फोनमध्ये ब्लास्ट होऊ शकतो. या पूर्वी अशा घटना घडल्या आहेत. बरेच जण मोबाईलमध्ये हेव्ही गेम्स खेळतात, त्यामुळेही फोनचा स्फोट होऊ शकतो. तसेच लेदर बॅग्ज वापरणंही चांगलं नाही. कारण त्या बॅग्ज लवकर गरम होतात, त्यात फोन ठेवलेला असेल तर तो उन्हाळ्यात स्फोट होऊ शकतो.

)







