नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : तुम्ही दारू पित नसाल, तरीही दारु पिताना 'चिअर्स' म्हटलं जातं, हे तुम्हाला निदान माहिती असेल. कारण विविध चित्रपटांमध्येसुद्धा तसं दाखवलं जातं. आपल्या देशातील काही भागांत दारूविक्री करण्यास बंदी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील काही देश असे आहेत, जेथे दारू पिण्यासोबत त्यासंबंधीत वैशिष्ट्यपूर्ण परंपरादेखील जपली जाते. आज आम्ही तुम्हाला दारू पिण्यासंबंधी वेगवेगळी परंपरा जपणाऱ्या अशाच देशांची माहिती देणार आहोत. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे दारू पिण्याची परंपरा खूप अनोखी आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, काही देशांमध्ये बुटामध्ये दारू टाकून पितात, तर कुठे दारू पिताना चिअर्स म्हणण्यास बंदी आहे. चला तर, आज आपण अशाच काही अनोख्या परंपरा जाणून घेऊ.
हेही वाचा - Viral Video : जुगाड तर बघा! लाकडापासून बनवली बाइक, लोक म्हणाले 'पतंजली तंत्रज्ञान'
नायजेरियात लग्नाच्या वेळी नववधूला तिच्या वडिलांकडून वाइनचा ग्लास दिला जातो. यानंतर, नववधू लग्नाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमोर तो वाइनचा ग्लास तिच्या पतीला देते. विशेष म्हणजे, जेव्हा नववधू तिच्या हाताने वाइनचा ग्लास नवरदेवाला देते, तेव्हाच त्या दोघाचं लग्न झालं, असं मानलं जातं.
रशिया आणि पोलंडमध्ये व्होडकामध्ये ज्युस मिसळणं वाईट मानलं जातं. तसेच नेदरलँड्समध्ये ‘कोप-स्टो-चे’ नावाची एक प्रथा आहे. ज्यामध्ये बारटेंडर एका ग्लासमध्ये जिनेव्हर आणि दुसऱ्या ग्लासमध्ये बिअर ओततो. मद्यपान करणाऱ्याला आधी हात न लावता जिनेव्हर प्यावं लागतं, नंतर बिअर.
वधूच्या बुटात दारू पिण्याची परंपरा
भारतात लग्नसोहळ्यात नवरदेवाचा बूट चोरण्याची परंपरा आहे. तर युक्रेनमध्ये एक अनोखी परंपरा आहे. येथे वधूचा बूट चोरला जातो. त्यानंतर लग्नात बूट चोरण्यासाठी आलेल्यांना वधूच्या त्याच बुटात दारू प्यावी लागते. या शिवाय, ऑस्ट्रेलियामध्येही लोक आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या बुटामध्ये टाकून दारू पितात.
चिअर्स म्हणण्यास आहे बंदी
दारू पिण्याआधी अनेकजण ‘चिअर्स’ म्हणतात. पण हंगेरीमध्ये दारू पिताना ग्लास एकमेकांना लावताना ‘चिअर्स’ म्हणायला बंदी आहे.1849 मध्ये काही हंगेरियन क्रांतिकारकांची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर ऑस्ट्रियन सैन्यानं दारू पिताना ‘चिअर्स’ म्हटलं होतं. तेव्हापासून हंगेरीमध्ये असं करण्यास मनाई आहे. दुसरीकडे, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये जर तुम्ही ‘चिअर्स’ करताना एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं नाही तर त्याचा परिणाम पुढील सात वर्षं तुमच्या सेक्स लाइफवर होतो. याला ‘सेव्हन इयर्स ऑफ बॅड सेक्स’असंही म्हणतात.
जर्मनीमध्ये दारू पिण्यासंबंधी एक अनोखी परंपरा जपली जाते. येथे लग्नसोहळ्यावेळी वराचा मित्र वधूचं अपहरण करतो, आणि तिला बारमध्ये घेऊन जातो. त्यानंतर तो बारमध्ये नवरदेव येण्याची वाट पाहतो. जेव्हा बारमध्ये नवरदेव येतो, तेव्हा त्याला वधूला तिथून घेऊन जाण्यासाठी बारमधील प्रत्येकजणाला दारू विकत घेऊन द्यावी लागते.
दरम्यान, दारू पिण्याबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या परंपरा जपल्या जात असून, सातत्याने याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Viral, Viral news