मुंबई 11 ऑक्टोंबर : तुमच्या सभोवताली अनेक एकल पालक बघितले असतील, जे एकटेच त्यांच्या मुलांचं संगोपन करतात. तरुणपणात एकटं जगणं सोपं वाटत असेल; पण उतारवयात ते शक्य नाही. मानसिक आधारासाठी एका पार्टनरची गरज असतेच. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या एका 56 वर्षांच्या पाकिस्तानी व्यक्तीची कहाणी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. 11 मुलांचा पिता असलेल्या या व्यक्तीने एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच वेळा लग्न केलंय. त्याला 10 मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी आठ मुलींचं लग्न झालं असून, मुलाचंही लग्न झालं आहे. विशेष म्हणजे याच मुलींनी वडिलांसाठी नवीन वधू शोधली आहे. या अनोख्या कथेचा व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. यामागचं सांगितलं धक्कादायक कारण ‘डेली पाकिस्तान ग्लोबल यू-ट्यूब चॅनेल’ने दिलेल्या माहितीनुसार, शौकत नावाच्या या व्यक्तीचं म्हणणं आहे, की त्यांना लग्न करायचं नव्हतं; पण दोन मुलींच्या हट्टापुढे त्यांनी हार मानली. शौकत यांनी सांगितलं, की ‘माझ्या आठ मुलींची लग्नं झाली आहेत. घरात दोनच मुली राहिल्या होत्या. लग्नानंतर माझ्याबरोबर कोणी नसेल म्हणून मुली माझ्या पाचव्या लग्नाच्या मागे लागल्या. दोन्ही मुलींनी माझ्यासाठी मुलगी शोधली आणि त्यांच्या लग्नाच्याच दिवशी लग्न लावून दिलं.’
शौकत यांच्या चारही पत्नींचं निधन झालंय. नव्या लग्नाबद्दल बोलताना शौकत सांगतात, ‘आयुष्यात प्रत्येकाला प्रेम मिळत नाही आणि मला 5-5 वेळा मिळालं. मुलींची इच्छा होती, की मी पुन्हा लग्न करावं. कारण मलाही माझं आयुष्य जगायचं आहे. म्हणूनच मीही हो म्हणालो.’ शौकत यांचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यांना 40 नातवंडं आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात एकूण 62 सदस्य आहेत आणि संपूर्ण कुटुंब एकत्र राहतं. त्याच वेळी शौकत यांच्या नव्या आणि पाचव्या पत्नीलाही एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबाची कोणतीही अडचण नाही. घरात एक वेळच्या जेवणासाठी संपूर्ण कुटुंबासाठी सुमारे 100 पोळ्या बनवल्या जातात. त्यांच्या बायकोलाही याचा काहीच त्रास नाही. ‘ती म्हणते, मला मोठं कुटुंब आवडतं आणि मी हळूहळू या कुटुंबाशी पूर्णपणे जुळवून घेईन, असं शौकत यांनी सांगितलं.’ शौकत यांच्या पाचव्या लग्नाची कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. काही जण त्यांच्या मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत. तर काही युझर्स या वयात पाचवं लग्न करण्याची खरंच गरज आहे का, असं म्हणत शौकत यांना ट्रोल करत आहेत.