मुंबई १६ नोव्हेंबर : अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या बदलांना विवाह संस्थादेखील अपवाद नाही. अगदी काही वर्षांपर्यंत विवाह हा संस्कार मानला जात होता. आता या गोष्टीला काहीसं कराराचं स्वरूप आलं आहे. काही महिन्यांपूर्वी एक वधू आणि वर जोरदार चर्चेत होते. या दोघांनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी एका विचित्र करारावर स्वाक्षरी केली होती. या करारातील अटी खूपच हटके होत्या. हा करार सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. वधूने या करारात नवऱ्याने मला दर महिन्याला पिझ्झा दिला पाहिजे, अशी अट घातली होती. या विषयी पिझ्झा हट कंपनीला माहिती मिळाली. त्यानंतर वधूची इच्छा पूर्ण करण्यासाठी पिझ्झा हटने पिझ्झा स्पॉन्सर केला. हे कपल पिझ्झा हटसाठी वर्षभराकरिता अॅम्बेसेडरसारखं ठरलं आहे. काही महिन्यांपूर्वी एका विवाहसोहळ्यात वधू आणि वरानं आपापसात एक करार करत त्यावर स्वाक्षरी केली. ही गोष्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. मिंटू राय असं वराचं नाव असून त्याचा विवाह शांती प्रसाद नावाच्या युवतीशी झाला. हे दोघं या वर्षी 21 जून रोजी विवाहबद्ध झाले. विवाहादरम्यान सप्तपदी झाल्यावर या जोडप्यानं एका करारावर स्वाक्षरी केली. विवाहानंतर काय करायचं आणि काय टाळायचं याची ही यादी होती. नवऱ्याने रोज जिमला गेलं पाहिजे, दर 15 दिवसांनी शॉपिंगला नेलं पाहिजे आणि दर महिन्याला पिझ्झा खाऊ घातला पाहिजे अशा अटी या करारात होत्या. या जोडप्याची पिझ्झा खाण्याची अट पिझ्झा हटला समजली आणि त्यांनी पिझ्झा स्पॉन्सर केला आहे. यानुसार या कपलला वर्षभर दरमहा एकदा फ्री पिझ्झा दिला जाणार आहे. पिझ्झा हट इंडियाने ‘करवा चौथ’च्या दिवशी ही घोषणा केली आहे. याबाबतची माहिती पिझ्झा हट इंडियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित दिली. या पोस्टमध्ये पिझ्झा हटनं म्हटलं आहे की “पतीसोबत दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी पत्नीला दर महिन्याला मोफत पिझ्झा.” सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत हे कपल पिझ्झा हट आउटलेटमध्ये जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 30 हजारांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. 1400 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सदेखील त्यावर कमेंट करत आहेत. पिझ्झा हट आउटलेटमध्ये या कपलनं अनेक प्रकारच्या स्वादिष्ट पिझ्झ्याचा आस्वाद घेतला आहे. त्यानंतर हे दोघं सेल्फी घेत आहेत, असंही या व्हिडिओत दिसतंय. मिंटू राय आणि शांती प्रसाद यांच्या विवाहाला आता बरेच महिने झाले आहेत. हे दोघं अन्य अटींचं पालन करतात की नाही, याबाबत माहिती नाही.
वधूची पिझ्झ्याची अट मात्र दरमहिन्याला पूर्ण होत आहे. एका वर्षासाठी हे कपल पिझ्झा हटचं जणू काही ब्रॅंड अॅम्बेसेडर बनले असून, दर महिन्याला ते आउटलेटमध्ये जात पिझ्झ्याचा आस्वाद घेत आहेत.