मुंबई 18 जानेवारी : एअर इंडियाशी संबंधित ‘लघवी’ प्रकरणानं आणखी एक वळण घेतलं आहे. फ्लाइट क्रूनं चार पानांचा अहवाल सादर केल्यानंतर हे वळण मिळालं आहे. या अहवालातील तपशीलानुसार, 72 वर्षीय तक्रारदार महिलेला एका सहप्रवाशानं भडकवलं असावं, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तक्रारदार महिलेच्या नंतरच्या वागणुकीमुळे तिचा उद्देश आणि प्रामाणिकपणा याबद्दल शंका निर्माण झाली आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. मनीकंट्रोलच्या हाती आलेल्या क्रू रिपोर्टनुसार, तक्रारदार महिलेचे सह-प्रवासी असलेल्या एस. भट्टाचार्जी यांनी तिला भडकवलं आहे. भट्टाचार्जी सीट 8A वर म्हणजेच तक्रारदार महिलेच्या समोर (9A) आणि आरोपी शंकर मिश्राच्या शेजारी( 8C) बसलेले होते. मनीकंट्रोलनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, भट्टाचार्जी यांनी प्रथम श्रेणीच्या बोर्डिंगमध्ये सुधारणा करण्याची विनंती क्रूकडे केली होती. पण, ती नाकारण्यात आली होती. या शिवाय, तक्रारदाराच्या शेजारच्या 9C सीटवरील प्रवाशाचं स्टेटमेंट तक्रारदाराच्या स्टेटमेंटच्या एकदमविरुद्ध असल्याचं क्रूनं आपल्या अहवालात नमूद केलेलं आहे. अमेरिकेतील ऑडिओलॉजीचे डॉ. सुगाता भट्टाचार्जी यांनी नुकतंच संपूर्ण घटनेचा वृत्तांत सांगितला होता. त्यांनी शंकर मिश्रा यांना दारूडा म्हटलं आहे. भट्टाचार्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या जेवणाच्या वेळी मिश्रा यांनी सिंगल माल्ट व्हिस्कीचे चार ग्लास प्यायले होते. घटना घडली तेव्हा भट्टाचार्जी झोपेत होते. ते म्हणाले, “आम्ही बिझनेस क्लास केबिनमध्ये पहिल्या रांगेत बसलेले होतो. मागे चार रांगा सोडून स्वच्छतागृह होतं. मला अजूनही समजलं नाही की तो (मिश्रा) उठला, लघवीसाठी पुढच्या रांगेत कसा काय गेला. विमानातील सीट्सच्या मधून जाणाऱ्या पॅसेजच्या बाजूला असलेल्या सीटवरही महिला प्रवासी बसली होती; पण जी महिला लघवीनं भिजली ती तर खिडकीशेजारील सीटवर बसली होती.” “या प्रकारानं ती महिला अस्वस्थ झालेली दिसत होती. तरीही केबिन क्रूनं तिला तिच्या अंगावर लघवी करणाऱ्या माणसाशी बोलण्यास प्रवृत्त केलं. नशेत असलेला माणूस शुद्धीत नसतो. जेव्हा असा एखादा गुन्हा केलेला माणूस पाहता तेव्हा तुम्ही त्याला माफी मागण्यासाठी पीडितेच्या समोर उभं नाही केलं पाहिजे,” असंही डॉ. भट्टाचार्जी म्हणाले. केबिन क्रूनं अहवालात नमूद केल्याप्रमाणे घटनांचा क्रम तक्रारदार महिला गॅलीत (विमानातील स्वयंपाकघर) आली. दुसर्या प्रवाशानं तिच्या अंगावर लघवी केल्यानं कपडे ओले झाल्याचं तिनं सांगितलं. तिला कपड्यांची स्वच्छता करायची होती. ती गॅलीमध्ये कपडे काढण्यास तयार होती. तिला टॉवेल, सॅव्हलॉन (अँटिसेप्टिक), चप्पल आणि मोजे देण्यात आले आणि कपडे बदलण्यासाठी स्वच्छतागृहात जाण्याची विनंती केली. क्रूनं तिला एअरलाइनच्या वतीनं नाईटवेअर देऊ केले. तोपर्यंत क्रूने तिचं सीट, आजूबाजूचा परिसर, तिचे शूज आणि 9A आणि 9C वरील प्रवाश्यांच्या पिशव्या स्वच्छ आणि निर्जंतुक केल्या. या महिलेनं तिचे शूज ड्राय-क्लीन करावेत अशी मागणी केली होती. पण, विमानात ड्राय-क्लिनिंगची कोणतीही सुविधा नसल्याचं तिला सांगण्यात आलं. अहवालात नमूद केल्याप्रमाणं, या महिलेनं एअर इंडियाकडे खराब झालेल्या वस्तूंची भरपाई मागितली होती. ती पोलीस तक्रार दाखल करण्याचा विचार करत आहे, असंही ती म्हणाली होती. सह-प्रवासी डॉ. भट्टाचार्जी लँडिंगनंतर तिची एका रिपोर्टरशी भेट घालून देणार असल्याचाही तिनं उल्लेख केला होता. क्रूनं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, त्यांनी पीडित महिलेला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. लँडिंगनंतर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली जाईल, असंही सांगण्यात आलं होतं. त्या महिलेनं सीट बदलून देण्याची मागणी केली नसली तरी तिला खराब झालेल्या 9A वरून हलवण्यात आलं आणि 12Cवर तिची व्यवस्था करण्यात आली होती. तिला ब्लँकेट आणि उशा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर तिने क्रूचे मदतीबद्दल आभार मानले आणि नंतर झोपी गेली. नंतर, आरोपी व्यक्तीनं तक्रारदाराची भेट घेतली आणि माफी मागितली, असं अहवालात म्हटलं आहे. त्यांनी प्रकरण मिटवून घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीनं या महिलेच्या वस्तू स्वच्छ आणि कोरड्या करून तिच्यापर्यंत पोहोचवण्याचे वचन दिलं आणि 200 डॉलर्सची भरपाई देण्याचंही मान्य केलं. मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, केबिन क्रूच्या अहवालातील माहिती आणि तक्रारदार महिलेनं सांगितलेल्या घटनाक्रमामध्ये तफावत दिसत आहे. 1) तक्रारदार महिलेनं सांगितलं की, लँडिंगच्या काही तास आधी क्रूनं तिची काहीही मदत केली नाही, तिचे शूज आणि पिशव्या काहीच स्वच्छ केल्या नाहीत. त्यांनी तिच्याकडे त्वरित लक्ष दिलं नाही. तिने 8A सीटवरील प्रवाशाशी संवाद साधल्यानंतर, म्हणजे भट्टाचार्जी यांच्याशी बोलल्यानंतर मग क्रुमेंबरच्या वागण्यात बदल झाला आणि त्यांनी तिची मदत केली. या पूर्वी, बोर्डिंग करताना भट्टाचार्जी यांनी प्रथम श्रेणीमध्ये सीट अपग्रेड करण्याची मागणी केली होती. त्यांना सांगण्यात आलं होतं की, विमानात बसल्यानंतर सुधारणा प्रदान करणं हे एअरलाइनच्या धोरणांविरुद्ध आहे. भट्टाचार्जी यांना या घटनेची माहिती होताच त्यांनी आरोपीच्या शेजारी (8C) बसण्यास नकार दिला आणि पुन्हा स्वतःसाठी आणि तक्रारदारासाठी सीट अपग्रेडची मागणी केली. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, तक्रारदार महिलेनं स्वतःचं सीट अपग्रेड करण्याची मागणी केली नव्हती. तोपर्यंत तिला ती मिळाली नव्हती. भट्टाचार्जी म्हणाले, “एअर इंडियाच्या अंतर्गत अहवालात केलेले सर्व आरोप निराधार आहेत. मी अपग्रेड मागितलं नव्हतं. लँडिंग करण्यापूर्वी मी स्वतःहून क्रूकडे लेखी तक्रार केली होती (माझ्याकडे त्याची एक प्रत आहे). एक सह-प्रवासी म्हणून मी संकटात असलेल्या वृद्ध महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला.” 2) तक्रारदार महिलेच्या शेजारी असलेल्या 9C या सीटवर बसलेल्या प्रवाश्याने दिलेलं स्टेटमेंट हे तक्रारदार महिलेने नंतर केलेल्या दाव्याच्या विपरीत होतं असं क्रूने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटल जातंय. 3) तक्रारदाराला कस्टम हॉलमध्ये जेव्हा कर्मचारी भेटले तेव्हा तिला व्हीलचेअर देण्यात आली होती. तरी तिने तक्रार केली की तिला उतरताना व्हीलचेअर दिली गेली नाही. एका क्रू मेंबरनं तक्रारदार महिलेला व्हीलचेअरवर बसलेलं पाहिल्याचं सांगितल्यावर या महिलेनं आपली भूमिका बदलली आणि ती घाईत असल्यानं व्हीलचेअर सोडल्याचं सांगितलं. 4) तक्रारदारानं आरोप केला की, आरोपी व्यक्तीनं भरपाईचं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी व्यक्ती त्या महिलेकडे भेटायला गेला होता. त्यांच्यातील संभाषणातून असं निदर्शनास आलं की, महिला प्रामाणिक नाही. कारण, आरोपी तिला त्यानं केलेला पेमेंटचा पुरावा दाखवत होता. तरी ती महिला ते मान्य करत नव्हती. मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियानं या प्रकराणाला मिळालेल्या नवीन वळणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.