नवी दिल्ली, 29 जून : सध्या आपल्या महाराष्ट्रात महिलांना तिकिटाच्या अर्ध्या किमतीत एसटी प्रवास करण्याची सुविधा मिळते. काही महिन्यांपूर्वीच ही सुविधा सुरू करण्यात आली. महाराष्ट्राच्या पाठोपाठ कर्नाटक सरकारनंही महिला प्रवाशांबद्दल एक पाऊल पुढे टाकलं आहे. तिथे महिलांना मोफत एसटी प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, याचा ऑटो रिक्षा व्यवसायावर परिणाम होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. बेंगळुरूमधील एका ऑटो रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुटपुंज्या कमाईमुळे निराश झालेला हा चालक रडताना दिसत आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. झेवियर नावाच्या युजरनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक मिनिटाची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे. क्लिपमध्ये एक ऑटोचालक एका स्थानिक रिपोर्टरशी कन्नडमध्ये बोलताना दिसत आहे. या संभाषणादरम्यान, ऑटो चालकाला अश्रू अनावर झाले. त्यानं सांगितलं की, बरेच तास रिक्षा चालवूनही त्याला फक्त 40 रुपये कमाई मिळाली आहे. कमी कमाईसाठी त्याने महिलांसाठी सुरू झालेल्या कर्नाटक सरकारच्या मोफत बस सेवेला जबाबदार धरलं आहे.
व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीनंही कॅप्शनमध्ये हेच मत मांडलं आहे. “सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 40 रुपये कमाई झाल्यानंतर बेंगळुरूतील एका ऑटोचालकाला अश्रू अनावर झाले. कर्नाटकातील नवीन काँग्रेस सरकारनं सुरू केलेल्या मोफत बस सेवेचा हा परिणाम आहे. हा प्रकार लोकांना गरिबीत ढकलत आहे,” असं कॅप्शन ट्विटरवरील व्हिडिओला दिलेलं आहे. ही पोस्ट 125के पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे आणि अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडिया युजर्समध्ये या पोस्टवरून शाब्दिक वाद सुरू झाले आहेत. काहींनी ऑटो ड्रायव्हरला सहानुभूती दाखवली. तर, काहींच्या मते या प्रकारामुळे ऑटो चालकांना वागण्याची शिस्त लागेल. कारण, अनेकदा बेंगळुरूमधील ऑटोचालक प्रवाशांना सहकार्य न करता उद्धटपणे वागतात.
A Bengaluru auto driver in tears after collecting just Rs 40/- from 8 am to 1 pm. This is the result of free bus rides given by the new Cong govt in Karnataka.
— Zavier (@ZavierIndia) June 25, 2023
Pushing people into poverty. pic.twitter.com/2RZEjA9pw8
दरम्यान, कर्नाटकमध्ये काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सत्तेत आलं आहे. नवीन सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेसनं सामान्य जनतेसाठी विविध योजना सुरू करण्याचा धडाका लावला आहे. महिलांसाठी मोफत बससेवा हा याचाच एक भाग आहे. महिलांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून त्या सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र, ऑटोरिक्षा चालकांनी या निर्णयावर टीका केली आहे. त्यांच्या मते, मोफत बससेवेमुळे त्यांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत आहे.