जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इथे सूर्य खरंच पश्चिमेला उगवतो... कुठे आहे असं ठिकाण? वाचा सविस्तर

इथे सूर्य खरंच पश्चिमेला उगवतो... कुठे आहे असं ठिकाण? वाचा सविस्तर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपण अनेकदा लोकांना बोलताना पाहिलं आहे की, आज काय सुर्य पश्चिमेला उगवलाय? पण आपल्याला माहित असतं की तो पूर्वेकडूनच उगवतो… पण सगळीकडे असं होत नाही

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 29 सप्टेंबर : खगोलशास्त्राने सूर्यमालेविषयी, अंतराळातल्या ग्रह-ताऱ्यांविषयी अनेक शोध लावले आहेत. कित्येक घटनांविषयी, ग्रह-ताऱ्यांविषयी सतत संशोधन सुरू आहे. या संशोधनामधून आपल्या सूर्यमालेतल्या ग्रहांबाबत अनोखी माहिती समोर येत असते. सर्वसाधारणपणे गुरू, शुक्र, शनी, पृथ्वी, बुध, मंगळ या ग्रहांविषयी शालेय स्तरावर बरीच माहिती उपलब्ध होते. त्याव्यतिरिक्त नेपच्यून आणि युरेनस असे आणखी दोन मोठे ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. त्यातल्या युरेनस या ग्रहाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. ती जाणून घेऊ या. सूर्य या ताऱ्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे चंद्र/उपग्रह आणि इतर घटक मिळून सूर्यमाला तयार होते. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंबगोलाकार कक्षेत फिरतो. यामुळे त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर कमी जास्त होत असतं. सूर्यमालेतले सर्वच ग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यापैकीच एक युरेनस आहे. युरेनसला अरुण किंवा हर्षल ग्रह असंही म्हणतात. हा सूर्यमालेतला तिसरा सर्वांत मोठा ग्रह आहे. सूर्यापासूनचा या ग्रहाचा क्रम पाहिल्यास त्याचा क्रमांक सातवा लागतो. त्याच्या आधी अनुक्रमे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू आणि शनी असे ग्रह येतात. विल्यम हर्षेल या शास्त्रज्ञानं 1781 मध्ये युरेनसचा शोध लावला. त्यामुळेही या ग्रहाला हर्षल असं नाव पडलं. पृथ्वीवर सूर्योदय पूर्वेकडून होतो. युरेनसवर मात्र सूर्य पश्चिमेकडून उगवतो. याचं कारण म्हणजे इतर ग्रहांच्या तुलनेत युरेनस वेगळ्या दिशेनं सूर्याभोवती फिरतो. युरेनस सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे असा फिरत असला, तरी स्वतःभोवती फिरताना तो पूर्वेकडून पश्चिमेकडे असा फिरतो. त्यामुळे तिथे उलट्या दिशेला सूर्योदय होतो. युरेनसला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 84.07 वर्षं लागतात. युरेनस सूर्यापासून बराच लांब असल्यामुळे तिथलं तापमान खूपच कमी आहे. दुर्बिणीतून पाहिल्यावर हा ग्रह हिरवा व निळा या रंगांचा दिसतो. शनीसारखंच युरेनसभोवतीही कडं आहे. हे कडं दुर्बिणीतून दिसत नाही. अंतराळयानांनी पाठविलेल्या छायाचित्रांमधून हे कडं असल्याचे काही पुरावे सापडले आहेत. युरेनसला 27 उपग्रह आहेत. या ग्रहावर वातावरणही दाट आहे. त्यात हायड्रोजन, मिथेन आणि हेलियम हे वायू आहेत. युरेनसचा आस 98 अंशांनी कललेला असल्यामुळे तो घरंगळल्यासारखा भास होतो. युरेनस ग्रहाचा शोध लागण्याआधी 100 वर्षांपूर्वी हा ग्रह काही शास्त्रज्ञांनी पाहिला होता; मात्र त्याची नोंद एक तारा अशी केली गेली होती. सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रहाचं खास वैशिष्ट्य आहे. त्यातल्या बुध ग्रहापासून शनीपर्यंतचे ग्रह नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकतात; मात्र शनीनंतरचे ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज पडते. युरेनसही दुर्बिणीनं पाहता येऊ शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात