नवी दिल्ली, 24 मार्च : शाळा-कॉलेज म्हटलं की, वेगवेगळ्या परीक्षा द्याव्याच लागतात. परीक्षा पास केल्याशिवाय एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत प्रवेश करता येत नाही. परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारले जातील आणि विद्यार्थी त्याचं काय उत्तर लिहितील हे सांगता येत नाही. काही लहान वयातील विद्यार्थी कमालीचे संवेदनशील आणि विचारी वृत्तीचे असतात, असा अनुभव परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासताना काही शिक्षकांना येतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलानं स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजातील अनिष्ट प्रथांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर ट्विटरवर व्हायरल होत आहे. या मुलाच्या उत्तरानं नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पाथफाइंडर पब्लिशिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ महेश्वर पेरी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका उत्तर पत्रिकेचा फोटो आहे. महेश्वर पेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो त्यांच्या इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या उत्तरपत्रिकेचा आहे. ज्यामध्ये त्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजातील वाईट गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. इयत्ता पाचवीतील या मुलाला अशा प्रश्न विचारण्यात आला होता की, “जर तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारक असता, तर भारताला मागास होण्यापासून रोखण्यासाठी त्या वेळी प्रचलित असलेल्या कोणत्या सामाजिक दुष्कृत्याचा नायनाट करायला तुम्हाला आवडलं असतं? त्यामागील कारण स्पष्ट करा?”
My Son responds to a question in a Class 5 exam paper.. pic.twitter.com/lR7BQASAzQ
— Maheshwer Peri (@maheshperi) March 15, 2023
या प्रश्नावर महेश्वर पेरी यांच्या मुलानं उत्तर लिहिलं आहे, “मी विधवा पुनर्विवाह कायदा सुरू करण्याला प्राधान्य दिलं असतं. जर एखादी स्त्री विधवा झाली तर तिला सती जावं लागत होतं किंवा पांढरी साडी नेसावी लागत असे. केस बांधून घराबाहेर पडता येत नव्हतं. जर या विधवा पुनर्विवाह करू शकल्या असत्या तर त्यांचं जीवन अधिक चांगलं आणि आनंदी झालं असतं.” मुलाच्या या उत्तरानं शिक्षकदेखील प्रभावीत झाले आहेत. त्यांनी त्याला ‘व्हेरी गुड’चा शेरा दिला आहे.
महेश्वर पेरी यांनी ट्विटरवर उत्तराचा फोटो पोस्ट करताच नेटिझन्सनी मुलाचं कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटर युजर्सनी या लहान मुलाच्या दयाळूपणाचं आणि उदात्त विचारांचं कौतुक केलं आहे. एका यूजरनं कमेंट केली की, “हा मुलगा खूप दयाळू आहे आणि त्याचं मन काळजीनं भरलेलं आहे… तुम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे.” दुसर्या एका यूजरनं कमेंट केली, “तुम्ही याला चांगले संस्कार दिले आहेत. शाब्बास.”