नवी दिल्ली, 20 जानेवारी : ‘सब्र का फल मीठा होता हैं’, अशी हिंदी म्हण कधीतरी तुमच्या कानांवर पडलीच असेल. म्हणजेच संयम ठेवल्यास शेवटी मिळणारी गोष्ट ही फार चांगली असते, अशा आशयाची ही म्हण आहे. पंजाबमधील एका 88 वर्षांच्या व्यक्तीला या म्हणीचा प्रत्यय आला आहे. महंत द्वारकादास असं या व्यक्तीचं नाव आहे. डेराबस्सी येथील रहिवासी असलेल्या द्वारकादास यांना पाच कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ते लॉटरीची तिकीटं खरेदी करत होते. शेवटी 16 जानेवारी रोजी त्यांचं नशीब पालटलं आणि ते कोट्यधीश झाले. महंत यांनी ‘लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी 2023’चं प्रथम पारितोषिक जिंकलं आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लॉटरीमध्ये पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर महंत यांनी एएनआयला सांगितलं की, ते खूप आनंदी आहेत. मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ते त्यांच्या दोन मुलांमध्ये आणि त्यांच्या ‘डेरा’मध्ये वाटणार आहेत. ते म्हणाले, “मला फार आनंद झाला आहे. मी गेल्या 35 ते 40 वर्षांपासून लॉटरीची तिकीटं खरेदी करत आहे. मी जिंकलेली रक्कम माझ्या दोन मुलांमध्ये आणि माझ्या डेऱ्यात वाटणार आहे.” महंत यांना पाच कोटी रुपयांची लॉटरी लागली असली तरी त्यांना बक्षिसाची पूर्ण रक्कम मिळणार नाही. कारण, लॉटरीच्या बक्षीसावर कर कपात केली जाईल. सहाय्यक लॉटरी संचालकांच्या मते, महंत यांना पाच कोटी रुपयांतून 30 टक्के कर कपात केल्यानंतर उर्वरित रक्कम मिळेल.
सहाय्यक लॉटरी संचालक करम सिंग यांनी एएनआयला सांगितलं, “पंजाब राज्य लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी 2023 चे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. महंत द्वारका दास यांनी पाच कोटी रुपयांचं पहिलं पारितोषिक जिंकलं आहे. विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, 30 टक्के कर कापून त्यांना बक्षिसाची रक्कम दिली जाईल.” महंत यांचा मुलगा नरेंद्र कुमार शर्मा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी नातवाकरवी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. या तिकीटामुळे त्यांना बक्षीस मिळालं याचा आम्हाला आनंद झाला आहे.
काही दशकांपूर्वी लॉटरी तिकीट खरेदी करण्याची फार क्रेझ होती. आजकाल ही क्रेझ काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. काही ज्येष्ठ व्यक्ती मात्र, आजही आवडीनं लॉटरी तिकीट खरेदी करतात. महंत द्वारकादास यापैकी एक आहेत आणि आता ते कोट्यधीश होणार आहेत.