कुमारी वीराण्णा, प्रतिनिधी मंगलगिरी (आंध्रप्रदेश), 24 मे : मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय मोडत आहे. पण लहान मुलांची स्मरणशक्ती उत्तम असते असं म्हणतात. त्याला योग्य पोषण मिळालं, तर एखादा अद्वितीय उदाहरण नक्की तयार होऊ शकतं. हैदराबादमध्ये एका लहानग्याच्या बाबतीत असाच एक चमत्कार घडलाय. ज्ञानवर्धन डामरला या अवघ्या 20 महिन्यांच्या मुलाला सामान्य ज्ञानाची अफाट माहिती आहे. जगभरातले 30 शास्त्रज्ञ आणि त्यांच्या संशोधनाबाबत 2 मिनिटं 20 सेकंदामध्ये तो अचूक माहिती सांगू शकतो. या उत्तम स्मरणशक्तीसाठी त्याचं नाव इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या या मुलाच्या यशामध्ये त्याच्या पालकांचा मोठा वाटा आहे. आंध्र प्रदेशातल्या मंगलगिरी इथले मूळ रहिवासी असलेल्या द्राक्ष साई डामरला आणि नीलिमा यांचा तो मुलगा आहे. सध्या ते तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद इथं राहतात. हैदराबादमधल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (IIT) द्राक्ष साई सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतात. संगारेड्डी जिल्ह्यातल्या कंदी इथं ही संस्था आहे. नीलिमादेखील हैदराबादमध्येच सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होत्या. 9 जुलै 2021 ला त्यांनी एका गोड मुलाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी ज्ञानवर्धन असं ठेवलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीप्रमाणे ज्ञानवर्धन लवकरच गोष्टी ओळखायला व त्यांची नावं स्पष्ट उच्चारायला शिकला. त्याच्या क्षमतेची जाणीव पालकांना झाली व त्यांनी त्याची स्मरणशक्ती उत्तम विकसित करायचं ठरवलं. आई नीलिमा यांनी नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्ण लक्ष ज्ञानवर्धनच्या प्रगतीवर केंद्रीत केलं. थोड्याच कालावधीत तो अनेक गोष्टी ओळखायला लागला व त्यांची नावं लक्षात ठेवू लागला. आता तो 30 फळं, 30 भाज्या, भारतातली 24 स्मारकं, 27 देशांचे ध्वज, भारतातली 23 राज्यं, इंग्रजी आणि तेलुगू अक्षरं, 30 फुलं, 50 प्राणी, 20 पक्षी, 30 वाहनं, 30 स्वातंत्र्यसैनिक, 20 व्यावसायिक, 1-20 अंक, सामान्य वापरातल्या 85 वस्तूंची नावं, शरीरातले 20 अवयव, 30 क्रियावाचक शब्द आणि 30 शास्त्रज्ञ व त्यांचे शोध इतक्या गोष्टी ओळखू व त्यांची नावं सांगू शकतो. त्याच्या या अफाट स्मरणशक्तीबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून 16 एप्रिल 2023मध्ये त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं. केवळ 20 महिन्यांचा असून 2 मिनिटं 20 सेकंदात तो 30 शास्त्रज्ञांची नावं व त्यांनी लावलेले शोध सांगतो. याबद्दल इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सचे भारतातले मुख्य समन्वयक बी. नरेंद्र यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं. हैदराबादमधील Sri Thyagaraya Gana Sabha इथं 7 मे 2023 रोजी झालेल्या कार्यक्रमात त्याचा गौरव करण्यात आला. मुलांच्या क्षमता लहान वयात ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं, तर असामान्य गोष्टी घडू शकतात हेच यावरून दिसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.