दंतेवाडा, 9 जुलै : सध्या छत्तीसगढमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून सर्वत्र पावसाचा वर्षाव सुरु आहे. शहरांसह गावांमध्येही पावसाच्या सरी कोसळत असून अशातच दंतेवाडामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन युवक बाईक चालवताना अंगाला साबण लावून अंघोळ करत शहरभर फिरत आहेत. माहिती मिळाली आहे की, पावसात अंघोळ करण्यासाठी आणि वातावरणाची मजा लुटण्यासाठी त्यांनी हा कारनामा केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसा या दोन युवकांना पकडण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आली आणि त्यांनी व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या युवकांना शोधून काढले. मग त्यादोघांना पोलीस स्थानकात आणले गेले आणि पोलिसांनी त्यांच्याकडून चूक कबूल करून घेत उठया बश्या काढायला लावल्या. दोघांनी पोलिसांसमोर माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही असे कबूल केले.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे दोन्ही तरुण दंतेवाडा येथील फरासपाल येथील रहिवासी आहेत. त्यापैकी एकाचे नाव देवदास कर्मा आणि दुसऱ्याचे नाव अंकुश कर्मा असे आहे. हे दोघेही गुरुवारी उन्हात इकडे तिकडे फिरत होते, दुपारनंतर वातावरण चांगले झाले आणि पाऊस पडू लागला, तेव्हा पावसाचा आनंद घेण्यासाठी त्यांनी पावसात आंघोळ करण्याचा विचार केला. त्यांनी दंतेवाडा बसस्थानकाजवळील एका दुकानातून साबण खरेदी केला. यानंतर त्यांनी टीशर्ट काढला आणि अंगाला साबण लावला, त्यानंतर दोघेही पावसात बाईक चालवायला गेले. दरम्यान मागून येणाऱ्या एका वाहनात बसलेल्या काही लोकांनी मोबाईल फोनद्वारे त्यांचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओची पोलिसांना माहिती मिळताच दोन्ही तरुणांचा शोध घेण्यात आला.