तिरुअनंतपुरम 08 जुलै : मागील वर्षी (2022) डिसेंबर महिन्यात दक्षिण कोरियामध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीचा ‘ब्रेन इटिंग अमीबा’मुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ या वर्षी मार्च महिन्यात फ्लोरिडामध्येही असंच प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या जीवघेण्या संसर्गबद्दल सर्वांच्या मनात दहशत निर्माण झाली होती. ‘नेग्लेरिया फॉवलेरी’ असं शास्त्रीय नाव असलेल्या या अमीबाचा संसर्ग आता भारतापर्यंत येऊन पोहोचला आहे. केरळच्या अलप्पुळा जिल्ह्यातल्या 15 वर्षांच्या एका मुलाचा या अमीबामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी साधारण एक आठवडाभर या मुलाला प्रचंड ताप होता. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा त्याच्या घराजवळच्या ओढ्यात आंघोळ करत असे. त्यामुळे हा ओढाच अमीबाचा संभाव्य स्रोत मानला जात आहे. हा अमीबा कोणत्याही नैसर्गिक वातावरणात, विशेषतः उबदार पाण्याच्या अधिवासात वाढतो. तलाव आणि नद्यांच्या गाळात आढळणाऱ्या जिवाणूंवर ते आपली गुजराण करतात. अमीबा खारट पाण्यात टिकाव धरू शकत नाही. म्हणून समुद्राच्या पाण्यात तो आढळत नाही. फ्लॅटमध्ये बंद होते 16 कुत्रे; त्यांच्यासोबतच राहात होती महिला, 3 वर्षांनी दरवाजा उघडताच दिसलं भयाण दृश्य तज्ज्ञांच्या मते, नेग्लेरिया फॉवलेरी हा अमीबा प्रदीर्घ काळापासून निसर्गात अस्तित्वात आहे; पण मानवाला त्याचा संसर्ग होण्याची प्रकरणं अत्यंत दुर्मीळ आहेत. नवी दिल्लीतल्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील न्यूरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पी. एन. रंजन म्हणाले, की संसर्गाचं नेमकं कारण पूर्णपणे समजलेलं नाही. तथापि, उबदार तापमानाचं पाणी या अमिबाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतं. विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत त्याची जास्त वाढ होते. वातावरणाची अशी परिस्थिती भारतात अजिबात दुर्मीळ नाही. डॉ. रंजन यांनी या अमीबाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. नेग्लेरिया फॉवलेरी म्हणजे काय? नेग्लेरिया फॉवलेरी हा ‘मेंदू खाणारा अमीबा’ म्हणून ओळखला जाणारा एकपेशीय जीव आहे. तलाव, गरम पाण्याचे झरे आणि अस्वच्छ जलतरण तलावांसारख्या उबदार गोड्या पाण्यात तो आढळतो. हा जीव इतका लहान आहे, की केवळ सूक्ष्मदर्शकानेच तो पाहिलं जाऊ शकतो. नेग्लेरिया फॉवलेरी ही नेग्लेरियाची एकमेव प्रजात आहे, जिचा संसर्ग मानवाला होऊ शकतो. पुरेसं क्लोरीन किंवा व्यवस्थित देखभाल नसलेल्या जलतरण तलाव, स्प्लॅश पॅड, सर्फ पार्क अशा ठिकाणीही काही वेळा हा अमीबा आढळला आहे. अमीबा त्याच्या ट्रॉफोझोइट अवस्थेत अधिक धोकादायक बनतो. कारण, तो त्याच्या आसपासच्या वातावरणाशी उत्तम पद्धतीनं जुळवून घेतो. 46 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात त्याची चांगली वाढ होते. रेफ्रिजरेशन केल्यास ट्रोफोझोइट्स वेगानं मारले जातात; मात्र सिस्ट अत्यंत थंडीतही टिकून राहू शकतात. मानवी शरीरात अमीबा कसा प्रवेश करतो? अमीबा माणसाच्या नाकातून शरीरात प्रवेश करतो. नंतर ऑलफॅक्टरी नर्व्हद्वारे मेंदूमध्ये जातो आणि मेंदूच्या ऊतींचा नाश करतो. त्यामुळे प्रायमरी अमीबिक मेनिंजोएन्सेफलायटिस (पीएएम) म्हणून ओळखला जाणारा गंभीर आणि घातक मेंदू संसर्ग होतो. या अमीबाचा संसर्ग कोणाला होऊ शकतो? मानवी शरीर ही नेग्लेरिया फॉवलेरीसाठी सुरक्षित जागा मानली जाते; मात्र त्याचा मानवी शरीरात प्रवेश आणि संसर्ग होणं फारच दुर्मीळ आहे. अमीबा मेंदूपर्यंत गेल्यानंतर होणारा पीएएम नावाचा गंभीर संसर्ग कोणावरही परिणाम करू शकतो; पण कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेली व्यक्ती, नाक आणि सायनसच्या समस्या असलेल्या व्यक्ती किंवा सतत उबदार गोड्या पाण्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना याचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. अमीबा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकतो का? एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला नेग्लेरिया फॉवलेरीचा संसर्ग होत नाही. हा संसर्ग प्रामुख्याने उबदार गोड्या पाण्याच्या वातावरणाशी संबंधित आहे. म्हणून सहसा जुलै ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान या अमीबाची वाढ होते. संसर्ग झाल्याचं कसं कळेल? मेंदूमध्ये अमीबा गेल्यानंतर पीएएम नावाची स्थिती निर्माण होते. याची लक्षणं सहसा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत दिसतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला तीव्र डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या, मान आखडणं, गोंधळ उडणं आणि भास होणं अशी लक्षणं जाणवू लागतात. जसजसा संसर्ग वाढत जातो तसतसा रुग्ण कोमात जाऊ शकतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. संसर्ग झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळाले तरीही यश मिळण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. जलतरणपटूने कोणत्या प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला पाहिजे? कमी क्लोरीन असलेल्या उबदार गोड्या पाण्यात सतत जाणं टाळल्यास, पाण्याशी संबंधित क्रिया करताना नाकातली क्लिप वापरल्यास आणि नाक साफ करण्यासाठी निर्जंतुक पाण्याचा वापर केल्यास नेग्लेरिया फॉवलेरी संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते. रुग्ण वाचण्याची शक्यता किती आहे? मेंदू खाणारा अमीबा फारच घातक आहे. त्याचा संसर्ग झाल्यानंतर नोंदवला गेलेला मृत्यू दर 97 टक्के आहे. संसर्गामुळे मेंदूच्या ऊतींचा झपाट्याने नाश होतो. अँटीफंगल औषधं आणि सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार मिळूनही या संसर्गापासून वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. कोणत्या प्रकारचे उपचार गरजेचे आहेत? यूएसमधल्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) औषधांचं कॉम्बिनेशन करून उपचार करण्याची शिफारस केली आहे. अॅम्फोटेरिसिन बी, अजिथ्रोमाइसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिल्टेफोसिन आणि डेक्सामेथॅझोन यांचा समावेश होतो. ही औषधं या संसर्गातून बचावलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली गेली आहेत. मिल्टेफोसिन हे यातलं सर्वांत नवीन औषध आहे. प्रयोगशाळेत नेग्लेरिया फॉवलेरी मारण्यासाठी याचा वापर झालेला आहे. त्यामुळे उपचारांमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.