गुवाहाटी, 02 नोव्हेंबर : लिफ्टमध्ये दुर्घटना घडल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. लिफ्टमुळे लहान मुलांचा जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशा भयंकर व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एक लहान मुलगा खेळता खेळता लिफ्टमध्ये गेला आणि तिथंच अडकला. तासाभरानंतर लिफ्ट उघडण्यात आली. आसामच्या गुवाहाटीतील ही घटना आहे. 11 वर्षांचा एक मुलगा खेळत असताना फुटब्रीजच्या लिफ्टमध्ये गेला. लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक लिफ्ट बंद झाली आणि तो आतच अडकला. काही लोकांनी मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याचं पाहिलं. त्यामुळे तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे वाचा - लपंडाव खेळणाऱ्या मुलीचा वेदनादायक मृत्यू, खिडकीतून पाहताच वरुन आली लिफ्ट आणि… पोलीस आणि इतर लोकही लिफ्ट उघडण्यासाठी प्रयत्न करत होते. जवळपास तासाभर झाला होता. लिफ्टच्या आत मुलाचं काय झालं असेल, या चिंतेने, भीतीने सर्वांच्या मनात धाकधूक होत होती.
कसंबसं करून लिफ्टचा दरवाजा तोडण्यात यश मिळालं. जवळपास तासाभरानंतर लिफ्ट उघडली गेली. मुलगा लिफ्टच्या आत होता. सुदैवाने त्याला काही झालं नाही. त्याला सुखरूप पाहून कुठे सर्वांच्या जीवात जीव आला.
व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहाल तर लिफ्टमधून एक मुलगा बाहेर येताना दिसतो. तो एकदम सुखरूप दिसतो आहे.