दहन की दफन यावरून पेटलं जागतिक राजकारण! Coronavirus मुळे मृत्यू झालेल्या श्रीलंकेतल्या मुस्लिमांचं मालदीव करणार दफन

दहन की दफन यावरून पेटलं जागतिक राजकारण! Coronavirus मुळे मृत्यू झालेल्या श्रीलंकेतल्या मुस्लिमांचं मालदीव करणार दफन

श्रीलंकेतील (Sri Lanka) कोरोनानं (Covid19) मृत्यूमुखी पडलेल्या मुस्लिमांना दफन करण्याची तयारी मालदीवनं (Maldives) दाखवली आहे. मालदीवच्या या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:

कोलंबो, 17 डिसेंबर : श्रीलंकेत (Sri Lanka)  कोरोनानं (Covid19) मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिमांना दफन करण्याची तयारी मालदीवनं (Maldives) दाखवली आहे. मालदीवच्या या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. दहन की दफन यावरून जागतिक राजकारण पेटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मालदिवच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्रांनी (United nations) जोरदार टीका केली आहे. मालदीवच्या या 'मदती'मुळे श्रीलंकेतील मुस्लीम आणखी वेगळे पडतील अशी भीती संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेचे प्रतिनिधी अहमद तौहिर यांनी व्यक्त केली आहे.

श्रीलंकेत कोविड-19 च्या कारणाने (Coronavirus) दगावलेल्या व्यक्तींचं दहन करण्यात येतं. तिथल्या सरकारने तसा आदेश दिला आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध कुठल्याही धर्माच्या व्यक्तीचं कोविडमुळे निधन झालं तर मृतदेहापासून होणाा संसर्ग टाळण्यासाठी दहनविधीच करण्यात येतो. त्यामुळे अर्थातच गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेत कोरोनानं मृत्यू पावलेल्या मुस्लीम नागरिकांना जाळण्यात येत आहे. श्रीलंका सरकारच्या या निर्णायाला  तेथील मुस्लीम संघटनांचा विरोध आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादलेले नाहीत. तरीही श्रीलंका सरकार मुस्लीम मृतदेह जाळण्यावर ठाम होते. श्रीलंकेत या विषयावरचा वाद संपलेला नसतानाच आता यामध्ये मालदीवनं उडी घेतली आहे. आमच्या भूमीत आम्ही श्रीलंकेतल्या मुस्लिमांचे मृतदेह दफन करू शकतोो, अशी तयारी या मुस्लीम देशाने दर्शवली आहे.

मालदीवचा श्रीलंकेसमोर प्रस्ताव

मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी श्रीलंकेतील जे मुस्लीम नागरिक कोव्हीड 19 मुळे मरण पावत आहेत त्यांच्या इस्लामी पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनी तसा प्रस्ताव श्रीलंकेच्या सरकारकडं पाठवला आहे. या निर्णयामुळे मुस्लीम बांधवांना दिलासा मिळेल असा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे. मालदीव हा एक सुन्नी मुस्लीम बहुल देश असून तो श्रीलंकेचा शेजारी आहे.

श्रीलंकेच्या सरकारनं मात्र याबाबत कोणतीही विनंती मालदीवकडं केल्याच्या बातमीला पृष्टी दिलेली नाही. या विषयावर बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं श्रीलंकन सरकारच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.

श्रीलंकेत मुस्लीम टार्गेट?

श्रीलंकेत मुस्लिमांची लोकसंख्या ही 2 कोटी असून एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण 10 टक्के आहे. 2009 साली श्रीलंकेतील तामिळ गृहयुद्ध संपले. मात्र, त्यानंतर बौद्ध आणि मुस्लीम संघर्ष सातत्याने वाढत आहे. श्रीलंकेतील बौद्ध संघटनांचा मुस्लीम संघटनांवर धर्मांतरला चालना दिल्याचा आरोप आहे. यावर्षी काही बौद्ध भिक्षूंनी मुस्लीम घरांवर हल्ले केले होते, तसंच त्यांची दुकानं जाळली होती. श्रीलंकेत 2019 साली इस्टरच्या दिवशी चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुस्लिमांविरुद्धच्या हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसीसनं (ISIS) घेतली आहे.

मालदीवमध्ये जोरदार प्रतिक्रिया

मालदीव सरकारच्या ताज्या निर्णयानंतर देशातील अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे वर्णद्वेषाला चालना मिळेल असं मत नाराज नागरिकांनी व्यक्त केलं आहे. तर काही मालदीवच्या नागरिकांनी शेजारच्या देशातील मुस्लीम बांधवाना सरकार मदत करत असेल तर त्याला आपण पाठिंबा द्यायला हवा, अशी भावना व्यक्त केली आहे.

Published by: News18 Desk
First published: December 17, 2020, 5:50 PM IST

ताज्या बातम्या