जिनीव्हा, 09 एप्रिल : जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना, सध्या सर्व देश एकत्र या विषाणूविरोधात लढा देत आहेत. मात्र कोरोनाच्या या परिस्थितीला अमेरिकेसह इतर देशांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी कडक शब्दात WHOवर टीका केली होती. एवढेच नाही तर त्यांना फंड कमी करण्याची धमकीही दिली होती. या सगळ्यावर आता WHOचे महासंचालक टेड्रोस अॅडहॅन घेब्रियेसुस यांनी उत्तर दिले आहे. टेड्रोस यांनी WHO ही संघटना ‘चीनकेंद्री’ असल्याचा आरोप फेटाळून लावला आणि जेव्हा जग कोरोनाशी लढा देत आहे अशा वेळी निधी कमी करणे योग्य होणार नाही, असेही म्हंटले. त्याचबरोबर त्यांनी अमेरिका आणि चीनला एकत्रितपणे कोरोना विषाणूच्या साथीवर सामोरे जाण्याचे आवाहन केले . टेड्रोस यांनी, आंतरराष्ट्रीय ऐक्याशिवाय कोरोना विषाणूचा पराभव होऊ शकत नाही. त्यामुळं याचे राजकारण करू नका, असे आवाहनही केले. जिनेव्हा येथे पत्रकार परिषदेदरम्यान संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडहॅन घेब्रियेसुस यांनी , अमेरिका आणि चीनने एकत्र येऊन या धोकादायक शत्रूशी लढायला हवे, असे सांगितले. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघटनेवर चीनला पाठीशी घातल्याचा आरोप केला होता. ट्रम्प यांनी, आम्ही काही कारणांमुळे WHOला जास्त निधी देतो पण ते चीन-केंद्रित आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निधी कमी करण्याच्या विचारात आहोत. ट्रम्प यांनी ट्वीटद्वारे केलेले आरोप टेड्रोस यांनी फेटाळून लावले.
The W.H.O. really blew it. For some reason, funded largely by the United States, yet very China centric. We will be giving that a good look. Fortunately I rejected their advice on keeping our borders open to China early on. Why did they give us such a faulty recommendation?
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 7, 2020
ट्रेड्रोस यांच्या राजीनाम्याची होती मागणी WHOचे महासंचालक टेड्रोस अॅडहॅन घेब्रियेसुस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. चीनने कोरोनावर केलेली मात हा WHOचा कट असल्याची शंका काहींनी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूबाबत WHO चीनच्या कम्युनिस्ट सरकारवर विसंबून राहिल्याबद्दल अमेरिकन राजकारण्यांनी या संघटेनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बऱ्याच पाश्चात्य देशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनने कोरोना संसर्गाबाबत योग्य माहिती दिली नाही, त्यामुळे कोरोना जगभरात पसरला. चीनवर विश्वास ठेवणे ही चूक अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे सेनेटर मार्था मॅकस्ली यांनी, WHOने चीन सरकारवर विश्वास ठेवायला नको हवा होता. चीन सरकारने येथे उद्भवणारा व्हायरस लपविला आणि यामुळे अमेरिका व जगात विनाकारण लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे टेड्रोस यांनी आपली चूक मान्य करून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीली जगभरातून पाठिंबा मिळत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये जेव्हा चीनमध्ये 17 हजार 238 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तेव्हा टेड्रोस यांनी परदेशी प्रवास थांबविण्याची गरज नसल्याचे सांगितले. ही चूक साऱ्या जगाला महागात पडली. तर, काही लोकांच्या मते चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 40 लोकांचा मृत्यू झाला मात्र, त्यांनी मृतांचा आकडा 3300 सांगितला. चीनच्या अशा वागण्याला WHOने खतपाणी घातल्यामुळे कोरोना पसरल्याचे आरोप काही नेत्यांनी केले आहेत. संकलन, संपादन-प्रियांका गावडे.