Home /News /videsh /

अमेरिकेनं घेतला भविष्यकाळाचा वेध; दिला गंभीर इशारा

अमेरिकेनं घेतला भविष्यकाळाचा वेध; दिला गंभीर इशारा

नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलतर्फे (National Intelligence Council) 1997 पासून दर चार वर्षांनी असा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाचा हा सातवा अहवाल आहे.

नवी दिल्ली, 10 एप्रिल: अमेरिकेच्या इंटेलिजेंस कम्युनिटीनं (US intelligence Community)2040 मध्ये जग(World)कुठं असेल याचा एक अहवाल नुकताच जारी केला आहे. राजकीय अस्थिरता, वाढती आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा संघर्ष या काळात वाढण्याचा इशारा यात देण्यात आला आहे. ‘अ मोअर कॉन्टेस्टेड वर्ल्ड इज एन अटेम्प्ट टू लूक अ‍ॅट की ट्रेन्डस’नावाच्या (Entitled A More Contested World is an attempt to look at key trends) या अहवालात संभाव्य परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलतर्फे (National Intelligence Council) 1997 पासून दर चार वर्षांनी असा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाचा हा सातवा अहवाल आहे. बीबीसी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसारराजकीय नेते किंवा आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी असाल किंवा आगामी काळात अशा पदावर जाण्यासाठी वाटचाल करत असाल तर तुमच्यासाठी हा अहवाल त्रासदायक ठरू शकतो. या अभ्यासाद्वारे विविध देशांमध्ये आणि देशांतर्गत स्थितीत अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण होऊ शकते, यावर तसेच हे बदल घडवून आणणाऱ्या मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. राजकीय अस्थिरता (Political volatility) हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बर्‍याच देशांमध्ये लोक भविष्याबाबत निराशावादी आहेत. अविश्वासार्ह नेते, संस्था वाढत असून, आर्थिक, तंत्रज्ञान आणि लोकसंख्येनुसार बदलणाऱ्या प्रवाहांचा सामना करण्यास अकार्यक्षम किंवा अनुत्सुक आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे. अस्थिर लोकशाही : समविचारी लोकांचे गट निर्माण होत असून ते सरकारकडं आपल्या मागण्या मांडत आहेत; तर सरकारं आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करत आहेत. सरकारांच्या क्षमता आणि लोकांच्या अपेक्षांमधील तफावत वाढू शकते आणि राजकीय पातळीवर ध्रुवीकरण, लोकसंख्यावाद, निषेध आंदोलनं, हिंसा, अंतर्गत संघर्ष निर्माण होऊन राजकीय अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळं अपेक्षा अपूर्ण राहिलेल्याकडून लोकशाही धोक्यात येऊ शकते. या अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, बर्‍याच देशांमधील लोकशाही अस्थिर होण्याची आणि कोसळण्याचीही शक्यता आहे. कोरोना साथ एक गंभीर जागतिक समस्या : सध्याची साथीची स्थिती ही दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात एकाचवेळी उद्भवलेली गंभीर समस्या (Global disruption) आहे. या साथीनं अनेक बदलांना, विभाजनाला चालना दिली असून, अनेक गृहितकांना आव्हान दिलं आहे. सरकार किती चांगल्या प्रकारे या आव्हानाचा सामना करू शकेल हे ही उघड केलं आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. 2017 मधील अहवालात अशा प्रकारच्या संभाव्यतेचा समावेश होता. त्यामध्ये 2023 मध्ये एका जागतिक साथीमुळे संसर्ग रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रवास रोखण्याची कल्पना नोंदवण्यात आली होती. मात्र कोविड-19 ची अपेक्षा नव्हती,असं या अहवालाचे लेखन करणाऱ्या तज्ज्ञांनी मान्य केलं आहे. त्यांच्या मते यामुळं प्रदीर्घ काळाच्या धारणांना धक्का बसला असून,अर्थव्यवस्था, शासन, भू-राजकीय स्थिती आणि तंत्रज्ञान याबद्दल नवीन अनिश्चितता निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानासह हवामानातील बदल आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलदेखील अस्थिरतेची प्रमुख कारणं ठरू शकतात. परंतु जे गतीनं आणि सर्वात आधी तंत्रज्ञानाचा वापर करतात ते सक्षमदेखील होऊ शकतात. भू-राजकीय स्पर्धा(Geopolitical competition): आंतरराष्ट्रीय पातळीवरील  विश्लेषकांना अशी अपेक्षा आहे की, संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या जुन्या संस्था आता कमकुवत होत जातील आणि शीत युद्धानंतरच्या येत्या दोन दशकांत जागतिक पातळीवर प्रभाव निर्माण करण्याच्या स्पर्धेची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचेल. धार्मिक गटांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असे नेटवर्क तयार करतील की जिथे देश, राज्य यांच्या सीमांनाही फाटा दिला जाईल. नवीन शस्त्रांच्या वापरावर प्रतिबंध घालणं कठीण झालं की संघर्षाचा धोका अधिक वाढतो. जिहादी दहशतवाद सुरूच राहण्याची शक्यता असून युरोप, लॅटिन अमेरिका आणि उत्तर अमेरिकेत डावे आणि उजवे दहशतवादी वंशवाद, पर्यावरणवाद आणि सरकारविरोधी कट्टरतावाद यासारख्या मुद्द्यांना पुन्हा जिवंत करू शकतात असा इशारा यात देण्यात आला आहे. हे गट कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू अधिक धोकादायक बनू शकतात किंवा व्हर्च्युअल दहशतवादी प्रशिक्षण शिबिरं घेण्याची संकल्पना वास्तवात उतरवू शकतात. अमेरिका आणि चीनमधील स्पर्धा अनेक वादांच्या मूळाशी आहे. त्यापैकी एखादी सत्ता अधिक बलशाली होते किंवा दोहोंची समान पातळीवर स्पर्धा सुरू झाली की ते जगाला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागतात. 2004मधील एका अहवालानुसार, मध्य पूर्वेकडील देशांमध्ये एक चळवळ उभी राहत आहे. गेल्या दशकात इस्लामिक स्टेट समूहाने अशीच चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला होता. 2020 आणि त्यापुढील काळात आता अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेला विचार करण्यास भाग पाडणारी चीनबरोबरची स्पर्धा जोर पकडण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे ठोस दावे करण्यापेक्षा संभाव्य भविष्याचा अंदाज घेण्याचा हेतू या अहवालामागे आहे. मजबूत लोकशाही किंवा ‘वर्ल्ड अ‍ॅड्रीफ्ट’? 2040 साठी काही आशादायक स्थितीही यात वर्तवण्यात आली आहे. यामध्ये लोकशाहीचे पुनरुज्जीवनासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. अमेरिका आणि त्याचे सहयोगी देश तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगती यांच्या सहायाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांना सामोरे जातील, तर चीन आणि रशियात (हाँगकाँगसह) होणाऱ्या उलथापालथी सतत नवीन बदलांना विरोध दर्शवतलोकशाही बळकट करण्याचे आवाहन करतील. ‘वर्ल्ड अ‍ॅड्रिफ्ट सिनारिओमध्ये कोविड-19 च्या साथीमुळे बिघडलेली अर्थव्यवस्था सावरलेली नाही असं समजण्यात आलं आहे. अनेक देशांसह, व्यावसायिक संस्था आणि इतर गटांद्वारे आंतरराष्ट्रीय नियम आणि संस्थांकडे दुर्लक्ष केल्यानं आंतरराष्ट्रीय व्यवस्था दिशाहीन, अस्थिर आणि अराजक माजलेली झाली आहे. देशांतर्गत पातळीवरही अर्थव्यवस्था खोलवर विभाजित झालेली आहे, अशी कल्पना करण्यात आली आहे. एकाच चित्रात निराशावाद आणि आशावाद एकत्रित केलेला यात आढळत आहे. 2030 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जगात शोकात्मक आणि गतिमान अशी दोन्ही चित्रं दिसतील. मात्र त्याचवेळी हवामान बदल, दुष्काळ आणि अशांतता या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक चळवळी उभ्या राहतील आणि एक नवीन जागतिक युती घडवून आणतील. अर्थात, या अहवालात वर्तवण्यात आलेली परिस्थिती सांगितल्यानुसार प्रत्यक्षात येईल असे नाही. अनेक गोष्टींची मिसळ होऊनही किंवा काल्पनिक कथेप्रमाणेही परिस्थिती उद्भवू शकते. भविष्यातील संभाव्य धोक्यांसाठी तयारी करणे हाच या सगळ्या अभ्यासामागे हेतू आहे, असं या अहवालाच्या लेखकांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Death prediction, United States of America

पुढील बातम्या