Home /News /videsh /

UAE चे राष्ट्रपती शेख खलिफांनी घेतला अखेरचा श्वास, जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रप्रमुख अशी होती ओळख

UAE चे राष्ट्रपती शेख खलिफांनी घेतला अखेरचा श्वास, जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रप्रमुख अशी होती ओळख

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचं आज (13 मे 22) निधन (Death) झालं.

    नवी दिल्ली, 13 मे : संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचं आज (13 मे 22) निधन (Death) झालं. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबी (Abu Dhabi) अमिरातचे 16 वे शासक होते. शेख खलिफा हे शेख झायेद बिन सुलतान यांचे ज्येष्ठ पुत्र होते. शेख झायेद बिन सुलतान यांच्या मृत्यूनंतर (2 नोव्हेंबर 2004) शेख खलिफा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. 2004 पासून त्यांनी यूएईचा कारभार पाहिला. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती झाल्यापासून शेख खलिफा यांनी फेडरल सरकार आणि अबू धाबी सरकार या दोन्हींच्या संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शेख खलिफा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, शेख खलिफा यांच्या निधनानंतर यूएईमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यूएईमध्ये 40 दिवसांची राष्ट्रीय सुट्टी (National Holiday) असेल. या काळात सरकारी कार्यालयांतील ध्वज अर्ध्यात उतरवला जाईल. अमर उजालानं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 7 सप्टेंबर 1948 रोजी जन्मलेल्या शेख खलिफा यांनी सेंटहार्ट येथील रॉयल मिलिटरी अ‍ॅकॅडमीमधून (Royal Military Academy) पदवी प्राप्त केली होती. त्यांचे वडील 1966 मध्ये अबू धाबीचे शासक बनले तेव्हा शेख खलिफा यांना अबू धाबीच्या पूर्वेकडील प्रदेशाचं महापौरपद देण्यात आलं होतं. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांना अबू धाबीचा क्राउन प्रिन्स (Crown Prince) घोषित करण्यात आलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना संरक्षण मंत्रालयाचं प्रमुख बनवण्यात आलं. त्यांनी अबू धाबीचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली. वडिलांच्या निधनानंतर म्हणजेच नोव्हेंबर 2004 पासून ते प्रत्यक्षपणे देशाचा कारभार सांभाळत होते. असं असलं तरी वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे 1990 पासूनच अप्रत्यक्षपणे या पदाची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. जानेवारी 2014 मध्ये खलिफा यांना ब्रेन स्ट्रोकचा (Brain Strock) सामना करावा लागला होता. त्यानंतर ते राज्याच्या कामकाजापासून काहीसे दूर केले होते. आता त्यांचा धाकटा भाऊ शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आहे. शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाहयान हे जगातील सर्वांत श्रीमंत राष्ट्रप्रमुख होते. त्यांची एकूण वैयक्तिक संपत्ती (Wealth) एक हजार 286 अब्ज रुपयांची आहे. ते यूएईच्या केंद्रीय संरक्षण दलाचे सुप्रीम कमांडर (Supreme Commander), सुप्रीम पेट्रोलियम कौन्सिलचे (Supreme Petroleum Council) अध्यक्ष आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटीचे (Abu Dhabi Investment Authority) अध्यक्षही होते. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटी खलिफाच्या 61 हजार 976 अब्ज रुपयांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करते. या संस्थेच्या माध्यमातून खलिफा कुटुंबानं 10 हजार 626 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. सक्रिय देणगीदारांमध्ये खलिफांचं नाव अग्रस्थानी होतं. त्यांनी आपल्या संपत्तीतील मोठा भाग शिक्षण (Education) आणि आरोग्यासाठी (Health) दान केला आहे. इस्लामिक देशांबरोबरच पाश्चिमात्य देशांनाही त्यांनी कायम मदतीसाठी हात पुढे ठेवला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीतील कॅन्सर डिपार्टमेंटसाठी 1 हजार 65 कोटी रुपयांची देणगी (Donation) दिली होती. खलिफांकडे 593 फूट लांबीची यॉट (Yacht) होती. जिची अंदाजे किंमत 4 कोटी 291 रुपये इतकी आहे. ही यॉट पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे. 2013 साली लोर्सन यॉट कंपनीनं शेख खलिफा यांच्यासाठी तिची बांधणी केली होती. जगातील सर्वात लांब यॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यॉटमध्ये 60 क्रू मेंबर्स प्रवास करू शकतात. त्यांच्यासाठी 30 केबिन तर पाहुण्यांसाठी 36 रॉयल केबिन आहेत. याशिवाय, खलिफा यांच्याकडे स्वतःची रॉयल एअरलाइन (Royal Airline) कंपनीदेखील होती. ही कंपनी अबू धाबी सरकार आणि राजघराण्यातील सदस्यांना सेवा पुरवते. अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याच विमानाच्या मदतीनं अमेरिकेला गेले होते. यावरून वाद निर्माण झाला होता. दुबईत बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलिफा'चं नावही त्यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलेलं आहे. शेख खलिफा 'कसर अल वतन' नावाच्या महालात राहत होते. या महालाची किंमत सुमारे 3 हजार 553 कोटी रुपये आहे. याशिवाय फ्रान्समधील एव्हियन येथेही त्यांचा एक महाल आहे. आपल्या कारकीर्दीमध्ये खलिफा काहीवेळा वादातदेखील (Controversy) सापडले होते. 1995 मध्ये खलिफा यांनी आफ्रिकेतील सेशेल्समध्ये 20 लाख डॉलर्स खर्च करून 66 एकर बेट विकत घेतलं होतं. तिथे एक शाही राजवाडा बांधला. या जमिनीवरून वाद निर्माण झाले होते. राजवाड्याच्या बांधकामामुळे सुमारे आठ हजार लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. या बांधकामादरम्यान पाण्याची लाईन खराब झाली होती. त्यामुळे तेथील लोकांनी राजवाड्याच्या कामाला विरोध केला होता. त्या बदल्यात खलिफांनी स्थानिक लोकांना सुमारे 1.5 लाख डॉलर भरपाई आणि सेशेल्स सरकारला (Seychelles Government) 13 कोटी डॉलर्सच्या इंजेक्शन्ससह इतर आरोग्य सेवा दिल्या होत्या. 2016 मध्ये पनामा पेपर्स प्रकरणामध्येही शेख खलिफा यांचं नाव आलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार, खलिफा यांनी लंडनच्या ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये काही मालमत्ता खरेदी केली होती. ज्याची किंमत 121 अब्ज रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं.
    First published:

    Tags: Death, UAE

    पुढील बातम्या