दिल्ली, 23 जून : पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळालेल्या जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाबद्दल आजही कुतूहल आहे. त्याचे अवशेष शोधण्यासाठी याआधीही अनेक मोहिमा आखल्या गेल्या आहेत. टायटॅनिक जहाजाचे अवशेष सापडल्यानंतर ते पाहण्यासाठी पाच जण पाणबुडीतून गेले होते. ती पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलीय. समुद्रात 13 हजार फूट खाली गेलेली टायटन पाणबुडी बेपत्ता झाली होती. यामध्ये अब्जाधीश आणि ओशनगेट कंपनीचे सीईओ स्कॉकटन रश हेसुद्धा होते. पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद पाणबुडीत होते. याशिवाय पॉल हेन्री नार्जियालेट, हामिश हार्डिंग यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. पाणबुडीचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली. पाणबुडीचे अवशेष कॅनडातील जहाजावर तैनात असलेल्या रोबोटने ओळखले. टायटॅनिक टुरिजमसाठी ओशन गेट कंपनीची पाणबुडी 18 जूनला निघाली होती. पण सुरुवातीच्या काही तासातच संपर्क तुटला होता. तेव्हापासून पाणबुडीचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शोधमोहिम बराच काळ सुरू होती. त्यानंतर पाणबुडीत स्फोट झाल्याचा आणि त्यातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. समुद्रात पाच भागात अवशेष दिसल्याचं कॅनडाच्या जहाजावरील रोबोटच्या शोधातून समोर आलं. ओशनगेट कंपनीकडून सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या घटनेनंतर आता टायटॅनिक टूरिजमवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. टायटॅनिकचे अवशेष बघायला समुद्रात इतक्या खोलवर का जात आहेत असं विचारलं जातंय.
सध्या पाणबुडीचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मॉडर्न सी 130 हर्क्युलस, पी 8 सह 16 एअरक्राफ्टकडून या पाणबुडीचा शोध घेतला जात होता. यावेळी अवशेष आढळून आले असून ते काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अवशेष काढल्यानंतर त्याची तपासणी होईल. त्यानंतरच ठोसपणे काही सांगता येऊ शकेल. गेल्या काही दिवसांपासून टायटन पाणबुडी बेपत्ता झाल्याची चर्चा जगभरात केली जात होती. 111 वर्षांपुर्वी बुडालेलं टायटॅनिक जहाज सर्वात मोठं वाफेच्या इंजिनावर चालणारं टायटॅनिक जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासात बुडालं होतं. 111 वर्षांपूर्वी 15 एप्रिल 1922 रोजी ही घटना घडली होती. या दुर्घटनेत 1573 जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रशांत महासागरात बुडण्याआधी जहाज 10 एप्रिल रोजी साउदम्प्टनच्या किनारपट्टीवरून निघालं होतं. न्यूयॉर्क सिटीपर्यंत ते जहाज जाणार होतं.