लंडन, 19 ऑक्टोबर : गेल्या महिन्यात ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस या दोघांमध्ये अंतिम लढत झाली. यात लिझ ट्रस यांची सरशी झाली आणि त्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. मात्र अल्पावधीतच लिझ ट्रस याचं पंतप्रधानपद धोक्यात आलं आहे. मिनी बजेटमधील काही निर्णयांमुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत ब्रिटनमध्ये पुन्हा निवडणूक झाली तर ऋषी सुनक ट्रस यांना सहज हरवू शकतील, असं एका सर्व्हेमधून स्पष्ट झालं आहे. सुनक यांच्यासह माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जेरेमी हंट आणि पेनी मॉर्डेंट हेदेखील पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ट्रस यांची कामगिरी निराशाजनक असल्याचं कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या सदस्यांचं मत आहे, त्यामुळे असा पेच निर्माण झाला आहे. `आज तक`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. अर्थात या संघर्षामागे काही कारणं आहेत. लिझ ट्रस सरकारने नुकतंच संसदेत मिनी बजेट सादर केलं. सरकारने या बजेटमध्ये करवाढ तसंच महागाई रोखण्यासाठी काही पावलं उचलली. परंतु, सरकारने लगेचच ‘यू टर्न’ घेत आपला निर्णय बदलला. ट्रस यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा महागाईचा सामना करणाऱ्या ब्रिटनमधील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. याचे एक मुख्य कारण म्हणजे ट्रस यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात जनतेला अनेक आश्वासनं दिली होती. ट्रस यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेण्यात करकपात हे प्रमुख आश्वासन होतं. लिझ ट्रस यांनी सत्तेत आल्यानंतर करकपात केली. परंतु, 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी या निवडणुकीतल्या आश्वासनापासून फारकत घेतली. ट्रस यांनी कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय मागे घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत बंडखोरीची कुजबूज सुरू झाली आहे. वाचा - एलॉन मस्क वजन नियंत्रणासाठी घेतात ‘हे’ औषध; नेमकं या औषधीत असं विशेष काय? या पार्श्वभूमीवर, लिझ यांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. कॉन्झर्वेटिव्ह पक्षात जर आता निवडणूक झाली तर ऋषी सुनक हे पंतप्रधान लिझ ट्रस यांचा सहज पराभव करू शकतात. चुकीच्या नेतृत्वाची निवड केल्याने आम्हाला पश्चाताप होत असल्याची भूमिका टोरीच्या सदस्यांनी मांडल्याचं युगोव्हनं केलेल्या सर्व्हेच्या अहवालात म्हटलं आहे. ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह सदस्यांना पुन्हा एकदा निवडणुकीचा पर्याय उपलब्ध झाला तर त्यात 55 टक्के सदस्य आपलं मत सुनक यांना तर 25 टक्के लोकांची पसंती ट्रस यांना असेल. लिझ ट्रस यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या सदस्यांना पश्चाताप होत असल्याचं युगोव्हनं केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. ट्रस यांनी अनेकदा भूमिका बदलल्या आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षनेता आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असं बहुतांश म्हणजेच 55 टक्के सदस्यांना वाटतं. दुसरीकडे, ट्रस यांनी पंतप्रधानपदावर कायम राहावं, असं केवळ 38 टक्के सदस्यांना वाटतं.
सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह ऋषी सुनक, जेरेमी हंट आणि पेनी मॉर्डेंट हे प्रबळ दावेदार आहेत. 10 डाउनिंग स्ट्रीटवरील सर्वोच्चपदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सर्वाधिक पसंती असून, त्यांच्या बाजूनं 63 टक्के लोक आहेत. 32 टक्के लोक त्यांच्याकडे सर्वोच्च उमेदवार म्हणून पाहत आहेत, तर 23 टक्के लोकांना सुनक यांना सर्वोच्च पदावर पाहायचं आहे. जर लिझ ट्रस यांनी दबावामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तर, टोरी सदस्य त्यांच्या जागी बोरिस जॉन्सन यांना पुन्हा संधी देऊ शकतात, असं यूगोव्हनं केलेल्या सर्व्हेत म्हटलं आहे. लिझ ट्रस पंतप्रधान म्हणून खराब कामगिरी करत असल्याचं 83 टक्के लोकांचं म्हणणं आहे. त्यापैकी 72 टक्के लोकांनी ट्रस यांना मतदान केलेलं आहे, असं कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. मात्र ट्रस यांना मतदान केलेल्या केवळ 15 टक्के लोकांना त्यांचे काम चांगलं असल्याचं वाटत आहे.