इस्लामाबाद, 10 एप्रिल: पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलं आहे. पाकिस्तानी संसदेत (Pakistani parliament) इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात (no-confidence motion) त्यांच्या सरकारचा पराभव झाला. इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. 342 सदस्यांच्या संसदेत 174 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. तर इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. याच सद्यस्थितीत पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरते दरम्यान पाकिस्तानच्या महिला पत्रकारानं शेअर केलेल्या व्हिडिओची बरीच चर्चा रंगू लागली आहे. पाकिस्तानच्या महिला पत्रकार Naila Inayat यांनी दिवंगत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक संसदेतला व्हिडिओ शेअर केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा हा व्हिडिओ 1996 मधला सभागृहातला आहे.
Late Indian prime minister Atal Bihari Vajpayee announcing his resignation on the floor of the house in 1996, after failing to secure majority. pic.twitter.com/UUqxx8JsqG
— Naila Inayat (@nailainayat) April 9, 2022
दिवंगत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर 1996 मध्ये सभागृहात राजीनामा देण्याची घोषणा केली, त्यावेळचा हा व्हिडिओ नाइला इनायत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. पाकिस्तानात इम्रान खान यांचं कोसळलं सरकार नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री12 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवलेले इम्रान हे पहिले नेते आहेत. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री इम्रान खान मतदानापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. इम्रान खान यांनी केलं होतं भारताचं कौतुक इम्रान खान यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना भारताचे कौतुक केलं होतं. रशियाबाबत आपलं धोरण काय असावं हे भारताला सांगण्याचे धाडस कोणत्याही युरोपियन राजदूतात नाही, असं ते म्हणाले होते. भारतातील जनता खूप प्रामाणिक असल्याचंही इम्रान खान यांनी म्हटलं. यावेळी इम्रान खान यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, जगातील कोणत्याही देशामध्ये भारताला आपल्या परराष्ट्र धोरणाचे ज्ञान देण्याची हिंमत नाही. त्यांनी भारताचे वर्णन निस्वार्थी राष्ट्र असं केलं.