नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर गेल्या मंगळवारपासून ऋषी सुनक यांच्याबद्दल इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जात आहे. प्रत्येकजण ऋषी सुनक यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर भारतात आनंदाची लाट उसळली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे लोकही ऋषी सुनक यांच्याशी त्यांचे संबंध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे पंजाबी खत्री कुटुंबातील आहेत. ऋषी सुनक यांचे आजोबा स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतातील गुजरांवाला येथून आफ्रिकेत स्थायिक झाले होते. यानंतर ऋषी यांचे वडील आफ्रिकेतून ब्रिटनला गेले.
त्याच वेळी, 1947 मध्ये फाळणीच्या वेळी गुजरांवाला पाकिस्तानात गेले. सध्या, गुजरांवाला हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. यामुळे पाकिस्तानी लोक ऋषी सुनक यांचे पाकिस्तानी कनेक्शन सांगत आहेत. प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनी ट्विट करून ऋषी सुनक यांच्याविषयी विशेष माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'तुम्हाला माहिती आहे का की ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरांवाला शहरातील रहिवासी होते. पाकिस्तानातील हे शहर महाराजा रणजित सिंह यांचे जन्मस्थान म्हणूनही जगात प्रसिद्ध आहे.
वाचा - गीतेवर हात ठेवून शपथ, लंडनध्ये दिवाळी; यूकेचे नवे PM ऋषी सुनक यांच्या खास गोष्टी
ऋषी सुनक यांच्या मूळाबद्दल पाकिस्तानी ट्विटरवर सतत ट्विट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'ऋषी सुनक यांचे आजोबा गुजरांवालाचे रहिवासी आहेत, जे सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहर आहे. 1930 मध्ये ते केनियाला गेले होते.
दुसरीकडे, दुसर्या युजरने ट्विट करत लिहिले की, 'ऐतिहासिकदृष्ट्या ऋषी सुनक यांची मुळे पाकिस्तानातील गुजरांवाला येथे आहेत. ते मूळ हिंदू असल्याने भारतीय आणि पाश्चिमात्य मीडिया टू नेशन थिअरीचा प्रचार करत आहे.
आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, 'ऋषी सुनक यांचे पूर्वज पाकिस्तानचे होते. असे असूनही एकही पाकिस्तानी याचा अभिमान बाळगत नाही, कारण ते हिंदू आहेत. मात्र, एका भारतीय युजरने ट्विटला उत्तर देताना लिहिले की, 'ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा स्वातंत्र्यापूर्वी गुजरांवाला सोडून गेले होते. म्हणूनच ते हिंदुस्थानी आहेत. याशिवाय लोक ऋषी सुनक यांची जात, नेट वर्थ याविषयी सतत गुगलवर सर्च करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.