इस्लामाबाद, 10 एप्रिल : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan government) यांची संसदेत अविश्वास ठरावाद्वारे विरोधकांनी सत्तेतून हकालपट्टी केली. इम्रान खान सरकारच्या विरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव संसदेत मंजूर होण्यासाठी 342 सदस्यांच्या सभागृहात 172 मतांची आवश्यकता होती. या अविश्वास ठरावाला (no-confidence motion) 174 सदस्यांनी समर्थन दिलं. 9 एप्रिल रोजी उशिरा राष्ट्राला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले, ‘मी आयात केलेले सरकार स्वीकारणार नाही. मी लढण्यास तयार आहे.’ यापूर्वी 3 एप्रिल रोजी इम्रान खान यांनी संसद विसर्जित करण्याचा आणि पाकिस्तानमध्ये लवकर निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे (Supreme Court decision) त्यांना अविश्वास प्रस्ताव पुढे जाण्यास अडथळा आला. पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही बदला घेणार नाही. आम्ही लोकांना तुरुंगात टाकणार नाही, मात्र कायदा नक्कीच मार्ग काढेल. 11 एप्रिल रोजी होणाऱ्या पाकिस्तानी संसदेच्या बैठकीत देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड होण्याची शक्यता आहे. शाहबाज शरीफ हे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. ते स्वतः पंजाब प्रांताचे दोनदा मुख्यमंत्री राहिले आहेत. संयुक्त विरोधी पक्षाने त्यांना 3 एप्रिल रोजीच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडलं होतं. जाता-जाता इम्रान खान यांनी बनवला रंजक इतिहास इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासात अविश्वास ठरावाद्वारे सत्तेतून बेदखल झालेले पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अविश्वास प्रस्ताव हा पाकिस्तानमधील सरकारच्या प्रमुखाला हटवण्याचा एकमेव घटनात्मक मार्ग आहे. देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात एकाही पाकिस्तानी पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. युसूफ रझा गिलानी (2008 ते 2012) नवाझ शरीफ (2013 ते 2017) आणि इम्रान खान (2018 ते 2022) हे केवळ 3 पंतप्रधान 4 वर्षे पाकिस्तानात सरकारचे प्रमुख राहिले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानच्या इतिहासात केवळ 2 वेळा निवडून आलेल्या संसदेने आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. सत्तापालटामुळे पाकिस्तानातील बहुतांश सरकारे पडली आहेत. गेनराज झियाउल हक (वय 11 वर्षे) आणि जनरल परवेझ मुशर्रफ (वय 9 वर्षे) हे दोन लष्करी शासक आहेत ज्यांनी पाकिस्तान सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक वेळ सत्तेत घालवला आहे. इम्रान खान यांचा अमेरिकेवर कट रचल्याचा आरोप इम्रान खान यांनी अमेरिकेवर विरोधकांसोबत षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. मात्र अमेरिकेनं पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याचा नकार केला आहे. इम्रान खान यांच्या मते ते स्वतंत्र परराष्ट्र धोरण अवलंबत होते, जे पाकिस्तानी समुदायाच्या हिताचे होते. पण त्यांच्या सरकारच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणावर अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी आक्षेप घेतला म्हणून त्यांना सत्तेवरून घालवण्याचा कट रचला गेला. यावेळी इम्रान खान यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, जगातील कोणत्याही देशामध्ये भारताला आपल्या परराष्ट्र धोरणाचे ज्ञान देण्याची हिंमत नाही. त्यांनी भारताचे वर्णन निस्वार्थी राष्ट्र असं केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.