पाकिस्तान, 19 डिसेंबर: पाकिस्तानातील (Pakistan) कराची शहर (Karachi) शनिवारी भीषण स्फोटानं(Blast in Karachi) हादरुन गेला आहे. शहरातील शेरशाह पराचा चौक (Sher Shah Paracha Chowk) परिसरात हा स्फोट झाला असून यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. साबीर मेमन यांनी पाकिस्तानच्या जिओ न्यूजला पुष्टी दिली की स्फोटातील मृतांची संख्या 12 झाली आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट परिसरातील एका नाल्यात झाला. या स्फोटामुळे तेथे असलेल्या एका खासगी बँकेच्या इमारतीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाल्यातील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा स्फोट नाल्यातच झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. सध्या हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले
मात्र, खबरदारी म्हणून बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलीस आणि रेंजर्सही तैनात करण्यात आले आहेत. सध्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी शोधमोहीम पूर्ण केल्यानंतर बॉम्ब निकामी पथकाला स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू करता येणार आहे. सिंध रेंजर्सच्या (Sindh Rangers) वतीने एक निवेदनही जारी करण्यात आले आहे. शेरशाह पराचा चौकाजवळ झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे या निवेदनात म्हटलं आहे.
बँकेची इमारत आणि जवळच्या पेट्रोल पंपाचं नुकसान
शहरातील एसएचओ जफर अली शाह यांनी सांगितलं की, हा स्फोट परिसरातील एका खासगी बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात झाला. नाला साफ करता यावा म्हणून बँकेला जागा रिकामी करण्याची नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. या स्फोटात बँकेच्या इमारतीचे आणि जवळच्या पेट्रोल पंपाचे नुकसान झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
TW Explosion inside a branch of HBL near Paracha Chowk in Shershah - several injured, extensive damage. As per initial information, the blast is reported to have occurred in an underground gas pipeline, BDS called in for further clarity.#Karachi #Pakistan pic.twitter.com/DwDgCBnyEN
— Yusra Askari (@YusraSAskari) December 18, 2021
इमारतीखालील नाल्यात वायू साचल्यामुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे, असे या अधिकाऱ्यानं सांगितलं. स्फोटाच्या फुटेजमध्ये एक नुकसानग्रस्त झालेली इमारत आणि ढिगारा जमिनीवर पडलेला दिसत आहे. स्फोटाच्या ठिकाणी नुकसान झालेली वाहनंही पाहायला मिळतात. लोक ढिगारा साफ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ढिगाऱ्याखाली लोक गाडल्याचंही वृत्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan