Home /News /videsh /

..म्हणून Mariupol शहर ठरतंय प्रतिष्ठेचा प्रश्न; माघार घेण्याची रशियाने दिली धमकी, आत्मसमर्पणास युक्रेनचा नकार

..म्हणून Mariupol शहर ठरतंय प्रतिष्ठेचा प्रश्न; माघार घेण्याची रशियाने दिली धमकी, आत्मसमर्पणास युक्रेनचा नकार

रशियानं युक्रेनला मारियुपोल शहर रिकामं करण्याचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला आहे. मात्र, युक्रेनच्या लष्करानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे.

नवी दिल्ली 21 मार्च : युक्रेन आणि रशियातील (Russia Ukraine War) संघर्ष शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. आग्नेय युक्रेनमधील महत्त्वाचं बंदर असलेल्या मारियुपोल (Mariupol) या शहरासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये भयानक संघर्ष सुरू आहे. रशियन सैन्यानं मारियुपोल शहरामध्ये असलेल्या युरोपमधील सर्वांत मोठ्या लोखंड आणि स्टील प्लाँटलादेखील (Europe’s biggest iron and steel works) लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यात अझोव्स्टल स्टील प्लाँटचं (Azovstal Steel Plant) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याशिवाय रशियानं मारियुपोल शहरातील आर्ट स्कूलच्या (Art School Bombed) इमारतीवर बॉम्बफेक केली आहे. या इमारतीमध्ये 400 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात शाळेची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. रशियानं युक्रेनला मारियुपोल शहर रिकामं करण्याचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला आहे. मात्र, युक्रेनच्या लष्करानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे. एकूणच रशिया-युक्रेन युद्धात मारियुपोलचा ताबा आता प्रतिष्ठेची गोष्ट ठरत आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट? या कारणामुळे युक्रेनच्या मदतीस तयार नाही NATO युक्रेनच्या सैन्यानं माघार घेतली नाही तर मारियुपोलमध्ये भयकंर नरसंहार (Genocide) होऊ शकतो, अशी धमकी रशियानं दिली आहे. रशियाच्या राष्ट्रीय संरक्षण व्यवस्थापन केंद्राचे संचालक आणि कर्नल-जनरल मिखाईल मिझिंतसेव्ह (Mikhail Mizintsev) म्हणाले होते की, 'एक मोठं मानवतावादी संकट समोर आहे. अशा परिस्थितीत, जे शस्त्रं ठेवतील त्यांना मारियुपोलमधून सुरक्षितपणे बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.' रशियाच्या या इशाऱ्यानंतर युक्रेनच्या डेप्युटी सीएम इरिना वेरेश्चुक (Iryna Vereshchuk) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं वेरेश्चुक म्हणाल्या आहेत. मारियुपोल शहर दक्षिण आणि पूर्व युक्रेनला जोडण्याचं काम करतं. पुतिन यांच्या सैन्यानं या शहरावर ताबा मिळवला तर रशियाला याचा मोठा फायदा होईल. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहरावर सर्वाधिक बॉम्ब हल्ले केले आहेत. 24 फेब्रुवारीनंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. या शहरामध्ये अजूनही सुमारे चार लाख लोक अडकलेले आहेत. तिथे अन्न, पाणी आणि विजेची तीव्र टंचाई भासत आहे. या लोकांना बाहेर काढण्यासाठी ह्युमॅनेटेरियन कॉरिडॉर (Humanitarian Corridor) उघडावे लागतील. पण, अद्याप याबाबत कुठलीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत.

रशियाचे 'किंझल' मिसाईल हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा 33 पट अधिक शक्तिशाली

मिळालेल्या माहितीनुसार, रशियन बॉम्बहल्ल्यांत आतापर्यंत मारियुपोलमधील 80 टक्के इमारती नष्ट झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मारियुपोलमधील थिएटरवरही रशियन सैन्यानं बॉम्ब टाकले होते. या थिएटरखाली 400 लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. मारियुपोलवरील हल्ल्यांनंतर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रशियानं चालवलेला हा दहशतवाद पुढील अनेक दशकं लक्षात राहील, असं ते म्हणाले. रशिया-युक्रेन युद्धाचा आज 26वा दिवस आहे. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात हजारो युक्रेनियन नागरिक मारले गेल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. या युद्धात 13 हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेननं केला आहे. याशिवाय अनेक रशियन विमानं, टँक आणि तोफा नष्ट झाल्याचंही युक्रेनचं म्हणणं आहे. सध्याची परिस्थिती पाहता युक्रेन आणि रशिया हे दोन्हीही देश माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं दिसतं.
First published:

Tags: Russia Ukraine, War

पुढील बातम्या