वेलिंग्टन, 23 मार्च : साऱ्या जगात सध्या कोरोनाने हाहाकार माजला आहे. जगातील 110 देशांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 13 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 3 लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडमध्येही कोरोनाचा धोका वाढत आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 102 वर पोहचली आहे. त्यामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे.
यावेळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंदा अर्डर्न यांनी लोकांना घरी बसण्याचा इशारा दिला आहे. लॉक डाऊनमुळे न्यूझीलंडमधील पब, जिम आणि क्लब बंद करण्यात आले आहेत. गेल्या 48 तासात न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान जेसिंदा अर्डर्न यांनी लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. तसेच, लोकांनी काळजी न घेतल्यास 10 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे.
जेसिंदा अर्डर्न यांनी जनतेला संबोधित करताना, "आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. पण जर तुम्ही साथ दिली नाही तर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याकडे 48 तास आहेत. चौथ्या टप्प्यात गेल्यास देशावर संकट येईल", असे सांगितले. न्यूझीलंडमध्ये गेल्या 48 तासात रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे 5 लाख लोकांना याआधीच सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे. तसेच, विमानसेवा ही बंद करण्याच्या तयारीत पंतप्रधान आहेत.
सध्या फक्त दवाखाने, वैद्यकीय सेवा, बँक सुरू ठेवण्यात आल्या आहेत. लोकांनी गरज पडल्यास घरा बाहेर पडावे. अथवा त्यांच्यावर कारवाई ही करण्यात येईल असेही जेसिंदा अर्डर्न यांनी सांगितले.
न्यूझीलंडमधील लोकसंख्या पाहता कोरोनाचे संक्रमण झपाट्याने होत आहे. त्यामुळे शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. अद्याप न्यूझीलंडमध्ये एकचाही मृत्यू झालेला नाही. मात्र सरकारच्या वतीने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
याआधी चीन, इराण, स्पेन, इटली, कॅनडा या देशांसह भारतात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे.