काठमांडू, 15 जानेवारी : नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी येती एयरलाईन्सच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत 68 प्रवाशांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा अपघात झाला त्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत नवी माहिती समोर येत आहे. या विमानतळाचं उद्घाटन नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दोन आठवड्यांपूर्वीच केलं होतं. 1 जानेवारीला नेपाळच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या या विमानतळाच्या उभारणीला चीनची मदत झाली आहे. या विमानतळामुळे पोखराचे आंतरराष्ट्रीय संबंध स्थापित होतील, असा विश्वास नेपाळच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला होता. पोखरा विमानतळाच्या उद्घाटनाआधी वादही झाला होता. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ चीन-नेपाळ BRI सहयोगाची प्रमुख योजना आहे, अशी एकतर्फी घोषणा काठमांडूच्या चीनी दुतावासांकडून करण्यात आली होती. यानंतर चीनच्या बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह (BRI) वरून नेपाळमध्ये वाद झाला होता. नेपाळच्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान प्रचंड यांनी हा मुद्दा आताच का समोर आला? याबाबत चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणात बीआरआय योजनेच्या निर्मितीचा उल्लेखही केला नव्हता. नेपाळच्या येती एयरलाईन्सच्या एटीआर 72 या विमानात 72 प्रवासी होते, यात चालक दलातले 4 सदस्य, 5 भारतीय आणि 10 परदेशी नागरिकांचा समावेश होता.
रविवारी नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. आता या भीषण विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. pic.twitter.com/Ndu3U1g1Rs
— News18Lokmat (@News18lokmat) January 15, 2023
विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान प्रचंड यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली. एव्हरेस्टसह जगातल्या 14 सगळ्यात उंच डोंगररांगांपैकी 8 डोंगररांगा नेपाळमध्ये आहेत, त्यामुळे या भागात हवामानामध्ये अचानक बदल होतो, ज्यामुळे विमान दुर्घटनांचं प्रमाण जास्त आहे. नेपाळ नागरिक उड्डयन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी या दुर्घटनेला हवामानाला जबाबदार धरलं नाही, कारण रविवारी नेपाळचं वातावरण स्वच्छ होतं.