लंडन, 9 जानेवारी: नव्या कोरोना व्हायरस स्ट्रेनमुळे (New Coronavirus Strain) ब्रिटनमधील (Britain) परिस्थिती रोज गंभीर होत आहे. लंडनचे महापौर सादिक खान (London mayor Sadiq Khan) यांनी याबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. कोरोना पेशंट्सची संख्या आगामी काळात वाढण्याची भीती त्यांनी बोलून दाखवली आहे.
काय आहे भीती?
“व्हायरसचा संसर्ग कमी झाला नाही तर येत्या काही आठवड्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड्सची टंचाई निर्माण होऊ शकते. ही आणीबाणीची परिस्थिती असल्याचं आम्ही जाहीर करत आहोत. या व्हायरसनं आम्हाला धोक्याच्या बिंदू जवळ (Crisis point) आणून ठेवलं आहे. आता लवकर योग्य पावलं उचलली नाहीत तर राष्ट्रीय आरोग्य सेवेवरचा (National Health Service) ताण आणखी वाढेल. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होऊ शकतो.’’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या विषयावर ब्रिटीश सरकारनं मदत करावी असं खान यांनी आवाहन केलं आहे.
30 पैकी एकाला कोरोना!
लंडनमधील 30 पैकी एका व्यक्तीला कोरोनाचा (Covid-19) संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. लंडनच्या हॉस्पिटलमधील कोरोना पेशंट्सच्या संख्येत गेल्या काही आठवड्यांमध्ये 27 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर व्हेंटीलेटर्सची संख्या देखील 42 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. ‘‘नवा कोरोना स्ट्रेन रोखण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल ’’ अशी आशा, खान यांनी व्यक्त केली आहे.
नियम पाळण्याचं आवाहन
‘’लंडनच्या नागरिकांनी सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं’’ असं खान यांनी म्हंटलं आहे. अगदी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. तुम्ही, तुमचे कुटुंब, तुमचा मित्रपरिवार आणि लंडन शहर याचं संरक्षण करण्यासाठी घरामध्ये राहणं आवश्यक आहे,’’ अशी विनंती खान यांनी केली.
लंडनमधील परिस्थिती झपाट्यानं बिघडत असून एप्रिल महिन्यापेक्षा तिप्पट पेशंट्स सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.