बलात्काराचा आरोप असलेला तमिळनाडूमधील स्वयंघोषित साधू नित्यानंद 2018 मध्ये फार चर्चेत होता. त्याच्या दोन शिष्यांना अपहरणाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तो भारतातून पळून गेला होता. त्यानंतर त्यानं 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास' (यूएसके) नावाचं राष्ट्र तयार केल्याची घोषणा केली होती.
आता, भगवी वस्त्रं परिधान करून जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या जाहीर सभेत बोलणाऱ्या महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फोटोमधील स्त्रीचं नाव विजयप्रिया नित्यानंद असून ती जीनिव्हामध्ये यूएसकेची प्रतिनिधी म्हणून आल्याचं म्हटलं जात आहे.
व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, विजयप्रियानं तिच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि अनेक दागिने घातले होते. कपाळावर कुंकू आणि त्याला साजेशी भगवी साडी नेसलेली दिसत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जाहीर सभेत भारतावर टीका करणाऱ्या विजयप्रियानं आता एक स्पष्टीकरण जारी केलं आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
यूएसकेनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंनुसार, जीनिव्हामध्ये गेलेल्या यूएसके शिष्टमंडळाचं नेतृत्व विजयप्रियाकडे होतं. विजयप्रियानं यूएनमध्ये दिलेल्या भाषणात म्हटलं होतं की, भारतानं त्यांचे गुरू नित्यानंद यांचा छळ केला आहे. या नंतर विजयप्रियानं एका स्पष्टीकरण जारी केलं आहे. एका व्हिडिओ निवेदनात विजयप्रिया म्हणाली, "आम्ही भारत सरकारला देशातील हिंदुविरोधी घटकांवर कारवाई करण्याची विनंती करतो. हे घटक एसपीएच (नित्यानंद) आणि यूएसकेवर सतत शाब्दिक हल्ले करत आहेत आणि हिंसाचार भडकवत आहेत. या कृती बहुसंख्य भारतीयांची मूल्यं किंवा श्रद्धा प्रतिबिंबित करत नाहीत, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे."
विजयप्रिया नित्यानंद कोण आहे?
विजयप्रिया नित्यानंदला युनायटेड नेशन्समधील, 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास'ची कायमस्वरूपी राजदूत म्हणून ओळखलं जात आहे. कैलास हा बलात्काराचे आरोप असलेला स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंदचा आभासी देश आहे. विजयप्रिया नित्यानंदचे यूएनमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला लोकप्रियता मिळाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ती यूएसमध्ये राहते. तिनं 2014 मध्ये कॅनडातील मॅनिटोबा विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजीची पदवी घेतलेली आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलवरील माहितीनुसार तिला इंग्रजी, फ्रेंच, क्रेओल (कॅरेबियन) आणि पिजिन्स (मिश्रभाषा) बोलता येतात. यूएसके देशामध्ये तिला डिप्लोमॅट मानलं जातं. विजयप्रियाच्या उजव्या दंडावर नित्यानंदचा टॅटू आहे जो व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
संयुक्त राष्ट्रांतील मानवाधिकार कार्यालयानं गुरुवारी सांगितलं की, भारतून फरार नित्यानंदनं स्थापन केलेल्यात तथाकथित युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासच्या (यूएसके) प्रतिनिधींनी, गेल्या आठवड्यात जीनिव्हा येथील जाहीर सभांमध्ये केलेलं सबमिशन अप्रासंगिक होतं. अंतिम निकालाच्या मसुद्यात त्यांचा विचार केला जाणार नाही. यूएननं हेदेखील स्पष्ट केलं की, यूएसकेचं शिष्टमंडळ एक एनजीओ म्हणून यूएनच्या सार्वजनिक कार्यक्रमात सामील झालं होतं.
यूएन बैठकीला उपस्थित राहिलेल्या यूएसकेच्या शिष्टमंडळातील इतर सदस्यांमध्ये, कैलास सेंट लुईच्या प्रमुख सोना कामत, कैलास यूकेचे प्रमुख नित्या आत्मदायकी, कैलास फ्रान्सचे प्रमुख नित्या वेंकटेशानंद आणि कैलासा स्लोव्हेनियाच्या प्रमुख माँ प्रियंपारा नित्यानंद यांचा समावेश होता. त्यांनी यूएन बैठकीत नित्यानंदचं पोस्टरही लावलं होतं आणि त्याची पूजाही केली होती, असं या फोटोत दिसतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: International, Un, UNGA