जगात जिवंत ज्वालामुखी फार कमी आहेत. इटलीतील एटना पर्वत हा त्यापैकीच एक. या ज्वालामुखी पर्वताची उंची वाढत चालली आहे. गेल्या 3500 पेक्षा अधिक वर्षापासून इथं ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.
एटना पर्वत हा सर्वात तरुण ज्वालामुखी पर्वत मानला जातो. या पर्वताने आता सर्वोच्च उंची गाठली आहे. समुद्रसपाटीपासून या पर्वताची उंची आता 3357 मीटर झाल्याची माहिती केटानियातील शास्त्रज्ञांनी दिली आहे.
यावर्षी फेब्रवारीपासून आतापर्यंत सुमारे 50 वेळा या पर्वतातून राख आणि ज्वालामुखी बाहेर पडले आहेत. त्यामुळे या पर्वताचा आकार बदलत असून त्याची उंची वाढत आहे. 1981 मध्ये या पर्वताची उंची 3350 मीटर होती. त्यानंतर या पर्वताचे कडे कोसळले होते. 2018 मध्ये याच पर्वताची उंची 3326 मीटर इतकी कमी झाली होती.
एटना पर्वतातून फेब्रवारी महिन्यापासूनच राख आणि लावारस बाहेर पडत आहे. मात्र त्याचं प्रमाण मर्यादित असल्यामुळे आजूबाजूच्या गावांवर त्याचा कुठलाही विपरित परिणाम झालेला नाही.
कैटानिया शहरात राहणाऱ्या नागरिकांचे अनुभव विलक्षण आहेत. या पर्वतापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत जाणं सुरक्षित असलं तरी अऩेकदा या परिसरात पावसाप्रमाणे राख पडत असते.
एटना ज्वालामुखी हा जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखी असून सतत इथून लावारस आणि राख बाहेर पडत असते. युनायटेड नेशन्सने एटनाला दशकातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी जाहीर केलं आहे.
2001 पूर्वी हा ज्वालामुखी सक्रीय नव्हता. दोन वर्षातून एकदाच इथे उद्रेक होत असे. मात्र आता वारंवार याचा उद्रेक होत असतो.