पाकिस्तान, 11 ऑक्टोबर : आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड महागाई (Inflation) वाढली आहे. वाढत्या महागाईमुळं तेथील जनता त्रस्त आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं आहे. मात्र, पाकिस्तान (Pakistan) सरकारमधील मंत्र्यांना याबाबत गांभीर्य नसल्याचे समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री अली अमीन गंडापूर (Ali Amin Gandapur) यांनी महागाईच्या प्रश्नावर एक बेजाबदार वक्तव्य केलं आहे. अली अमीन यांच्याकडं पाकिस्तान प्रशासित काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान प्रकरणाचं खातं आहे. वाढत्या महागाईवर उपाय म्हणून पाकिस्तानच्या लोकांना 'चहामध्ये कमी साखर घाला आणि कमी जेवण करा' असा सल्ला या पाकिस्तानी मंत्र्यानं दिला आहे. पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये एका मेळाव्याला संबोधित करत असताना ते बोलत होते. बीबीसी हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात महागाई वाढली आहे. त्यामागे तीन मुख्य कारणं असल्याच मत पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ डॉ. साजिद अमीन यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ, पाकिस्तानी रुपयाचं घटतं मूल्य आणि सरकारनं लागू केलेली कर धोरणं यामुळं महागाई वाढत आहे. पाकिस्तान सरकार 'महसूल गोळा करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी इंधनासारख्या वस्तूंवर कर वाढवत आहे. त्यामुळं साहजिकचं महागाई वाढत आहे, असं देखील डॉ. अमीन यांनी स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानमध्ये अलीकडे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळं महागाईच्या मुद्द्यावरून राजकीय गोंधळ सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री अली अमीन गंडापूर यांनी आता नागरिकांना अजब सल्ला दिला आहे. महागाईवरील चर्चेवर भाष्य करताना ते म्हणाले, "जर आपण चहामध्ये थोडी कमी साखर टाकली तर चहा काय लगेच एकदम बेचव होणार नाही. अगदी त्याच प्रमाणं आपण थोडं कमी जेवण नाही करू शकत? आपल्या देशासाठी आपण इतका त्याग नाही करू शकत? असे प्रश्न केंद्रीय मंत्र्यांनी नागरिकांना केले. आपल्या भाषणातून अली अमीन यांनी एकप्रकारे देशातील जनतेला कमी महागाई कमी करण्यासाठी कमी खाण्याचा सल्ला दिल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये आहे. त्यांच भाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल आलं असून यूजर्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
कमी खाण्याचा सल्ला देऊन पाकिस्तानी केंद्रीय मंत्र्यांनी गरीबांची चेष्टा केल्याचं मत इस्लामाबादच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिसी इन्स्टिट्यूट (SDPI) मधील अर्थतज्ज्ञ डॉ. साजिद अमीन यांनी व्यक्त केलं आहे. बचतीचा सल्ला किंवा महागाई विरोध मोहिमा हा कधीच महागाईवर उपाय ठरू शकणार नाही.पाकिस्तानमध्ये महागाई विक्रमी पातळीवर पोहोचण्याची कारणं काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे. सरकारनं सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला डॉ. अमीन यांनी दिला आहे.
हे ही वाचा-पाकिस्तानची अण्वस्त्रे जगासाठी ठरतायेत मोठी डोकेदुखी; ही आहेत कारणं
पाकिस्तानची एकूण आयात त्याच्या एकूण निर्यातीपेक्षा जास्त आहे. सध्या देशात गहू, साखर यासारख्या खाद्यपदार्थांचीही आयात सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत हे बिल आणि व्यापार तूट कमी होत नाही, तोपर्यंत रुपयाच्या मूल्यात सुधारणा होण्याची फारशी आशा नाही. पाकिस्तान जागतिक बाजारपेठ नियंत्रित नाही करू शकत मात्र, देशांतर्गत ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तर नक्कीच करू शकतो. मूल्य नियंत्रण समित्यांच्या प्रभावी वापर करता येऊ शकतो. त्यासाठी सर्वप्रथम स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा सक्रिय करण्याची गरज आहे. अशा समित्यांचा योग्य वापर केला गेला तर किमतींची कृत्रिम वाढ नियंत्रित करण्यासाठी त्या खूप प्रभावी आहेत. साठेबाजी नियंत्रणात आणली तरी देखील महागाई कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती डॉ. अमीन यांनी दिली.
दरम्यान, पाकिस्तानी मंत्री किंवा लोकप्रतिनिधींनी जनतेला असा अजब सल्ला देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच सत्तारूढ 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ' (पीटीआय) च्या खासदार रियाज फत्याना यांनीही अली अमीन यांच्यासारखाच सल्ला दिला होता. स्वत: माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांनी देखील जनतेला कमी खाण्याचा सल्ला दिला होता. जेव्हा १९९८ मध्ये पाकिस्तानने अण्वस्र चाचणी केली होती तेव्हा पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जनतेला हा सल्ला दिला होता. कारण, पाकिस्तानवर अमेरिका आणि उर्वरित जगाकडून कठोर आर्थिक निर्बंध लादले जाण्याची शक्यता होती. पाकिस्तानी जनतेनं फक्त एक वेळ जेवण्याची तयारी ठेवावी, असे शरीफ म्हणाले होते. त्यांच्या पक्षानं अनेक वेळा सत्तेत आल्यानंतर बचत मोहीम चालवली आहे. पीटीआय सरकारनं देखील सुरुवातीच्या काळातच बचत मोहिमेची घोषणा केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.