इस्लामाबाद, 9 मे : पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरून अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये पाकिस्तानी रेंजर्स इम्रान खान यांना खेचत घेऊन जात असल्याचं दिसत आहे. इम्रान खान यांना अशाप्रकारे अटक म्हणजे त्यांचं अपहरण असल्याचा आरोप इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने केला आहे. पीटीआयने याबाबतचं ट्वीट केलं आहे. इम्रान खान यांना अटक करताना पाकिस्तानी रेंजर्सकडून धक्काबुक्की करण्यात आली, ज्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोपही पीटीआयने केला आहे. इम्रान खान यांच्या अटकेवेळी हायकोर्टाच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे. कोर्टावर रेंजर्सनी कब्जा केला आहे, वकिलांना यातना दिल्या जात आहेत, तसंच इम्रान खान यांच्या कारला घेरण्यात आलं आहे, असा आरोप पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी केला आहे. 70 वर्षांच्या इम्रान खान यांना टॉर्चर करण्यात येत आहे, त्यांना मारहाण करण्यात येत आहे. पीटीआयने या अटकेविरोधात देशभरात आंदोलन करावं, असं आवाहन पीटीआयकडून करण्यात येत आहे.
#WATCH पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) ने ट्वीट कर कहा, "पाकिस्तान रेंजर्स ने पीटीआई के अध्यक्ष इमरान खान का अपहरण कर लिया।"
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2023
(वीडियो सोर्स: पीटीआई का ट्विटर हैंडल।) pic.twitter.com/qBxWjTupYc
इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू इम्रान खान यांना अटक केल्यानंतर इस्लामाबाद शहरात कलम 144 लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच शहरातील परिस्थिती सामान्य असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. इम्रानवर कोणते आरोप? इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. सरकारी तोशाखान्यातल्या वस्तू परदेशात विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आले आहे. पंतप्रधानपदाच्या काळात वेगवेगळ्या देशांतून मिळालेल्या भेटवस्तू इम्रान खान यांनी परदेशात जास्त किंमतीला विकल्या, यातल्या काही भेटवस्तू त्यांनी पत्नी बुशरा बीबी यांनाही कोट्यवधी रुपयांना विकल्याचा दावा करण्यात येत आहे. महागड्या भेटवस्तूंमध्ये महागडं घड्याळ, हिरे, दागिन्यांचा समावेश आहे. या आरोपांनंतर इम्रान खान यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं, त्यामुळे इम्रान खान यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी 5 वर्षांची बंदी घालण्यात आली. माझ्यावर कोणताही खटला दाखल करण्यात आलेला नाही, तरीही त्यांना मला जेलमध्ये टाकायचं आहे, यासाठी मी तयार आहे. माझ्या हत्येचा दोन वेळा कट रचला गेला, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.