अबु धाबी, 31 मार्च : प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या ऱ्हासाला केवळ ध्वनी, जल आणि वायू प्रदूषणच नव्हे, तर प्लास्टिकचा होणारा अति वापर हेही एक कारण आहे. प्लास्टिक कृत्रिमरीत्या तयार केलं जातं. त्यामध्ये कार्बनचा वापर केला जातो. प्लास्टिकचं विघटन होत नसल्यामुळे प्लास्टिक पर्यावरणासाठी अतिशय घातक ठरत आहे. प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण सर्वच देशांसाठी एक मोठं संकट बनलं आहे. आपलं आयुष्य प्लास्टिक प्रदूषणाविरहित बनवण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. सर्व देशांतल्या सरकारने यासाठी अनेक नियमही बनवले आहेत. आता असंच एक मोठं पाऊल संयुक्त अरब अमिरातीनं (UAE) उचललं आहे. यासाठी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. यूएईच्या राजधानीचं शहर असलेल्या अबुधाबीमधल्या नगरपालिका आणि परिवहन विभागाच्या एकात्मिक परिवहन केंद्रानं (ITC) एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा (Public Transport Bus) वापर करणाऱ्या प्रवाशांना आता रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या (Empty Plasti Botle) देऊन मोफत प्रवास (Free Travel) करता येणार आहे. हे वृत्त ‘खलिज टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालं आहे. हा उपक्रम अबूधाबीची पर्यावरण एजन्सी (EAD), अबू धाबी कचरा व्यवस्थापन केंद्र ‘तडवीर’ आणि ‘डिग्रेड’ यांच्या सहकार्यानं सुरू करण्यात आला आहे. प्रमुख स्थानांवर बाटल्या परत करण्याची ही योजना राबवण्यासाठी EAD सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतल्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहे. इम्रान खानची नवी चाल, पराभव निश्चित पाहून विरोधकांसमोर संसद बरखास्त करण्याचा प्रस्ताव ‘पॉइंट्स फॉर प्लास्टिक : द बस टेरिफ’ असं नाव या उपक्रमाला देण्यात आलं आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात अबूधाबीच्या मुख्य बस स्थानकावर प्लास्टिक डिपॉझिट मशीन बसवण्यात येणार आहे. प्रवाशांना यामध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करता येणार आहेत. प्रवाशांनी जमा केलेल्या प्रत्येक रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीसाठी त्यांना पॉइंट्स दिले जातील. हे पॉइंट्स सार्वजनिक परिवहन बसमध्ये प्रवास करण्यासाठी भाडं म्हणून वापरले जाऊ शकतात. लहान बाटलीला (600 मिली किंवा कमी) 1 पॉइंट, तर 600 मिलीपेक्षा जास्त क्षमतेच्या प्लास्टिक बाटलीला 2 पॉइंट्स मिळतील. 10 पॉइंट्सचं मूल्य 1 डरहॅम एवढं असेल. जेवढे जास्त पॉइंट्स जमतील, तेवढा जास्त प्रवास मोफत करता येणार आहे. अशा पद्धतीने या पॉइंट्सच्या आधारावर हा प्रवास करता येणार आहे. जगाला प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी सर्वच देशांतली सरकारं वेगवेगळ्या घोषणा करत असतं. परंतु, जनतेने स्वतःहून जाणीवपूर्वक प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा आणि त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करायला हवा. तेव्हाच प्लास्टिक प्रदूषण कमी होऊ शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.