मुंबई, 19 मे : कोरोना काळात (Corona) भारतातील श्रीमंत (Rich Indians) व्यक्तींमध्ये एक ट्रेंड पाहायला मिळत आहे. येथील कोट्याधीश, अब्जाधीश व्यक्ती विदेशी नागरिकत्व (Citizenship) घेताना दिसत आहेत. ग्लोबल हेल्थ मायग्रेशन रिव्ह्यूच्या अहवालानुसार, केवळ 2020 या वर्षात 5000 भारतीय करोडपतींनी परदेशी नागरिकत्व स्विकारलं आहे. सध्या देखील हा ट्रेंड कायम आहे. कोरोनाकाळात याची अनेक कारणं समोर आली आहेत.
हाय नेटवर्थ (High Net worth)असलेले भारतीय उद्योजक आपल्या संपत्तीत वैविध्य ठेवण्यासाठी सुरक्षित आणि सोप्या गुंतवणूक पर्यायांचा सातत्याने शोध घेत आहेत. महामारीच्या काळात आरोग्यविषयक सुविधांसाठी आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित आयुष्य लाभावं याकरिता अन्य देशांमध्ये जात आहेत. तसेच परदेशात राहून आपली अर्थिक गुंतवणूक चांगल्या पध्दतीने करता येईल, असे त्यांना वाटत आहे.
कोरोना काळात भारतातील अब्जाधीशांची (billionaire)संख्या 40 ने वाढली. लंडन येथील नागरिकत्व सल्लागार कंपनी सीएस ग्लोबल पार्टनरच्या म्हणण्यानुसार, श्रीमंत भारतीयांमध्ये गुंतवणूक कार्यक्रमाअंतर्गत परकीय नागरिकत्व घेण्याकडे कल वाढला आहे. भारतात 6884 श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यातील 113 अब्जाधीश आहेत. महामारीच्या या कालावधीत या यादीत अजून 40 जणांची भर पडली आहे. आता देशात एकूण 153 अब्जाधीश झाले आहेत. 2020 मध्ये 5 हजार करोडपती परदेशात गेल्यानंतर ही संख्या वाढताना दिसत आहे.
परदेशात 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास भरावा लागतो कर
भारतीय वकील आणि मिनियनायर ऑफ द मुव्ह पुस्तकाचे लेखक प्रशांत अजमेरा यांनी भारत सरकार श्रीमंत भारतीयांना परदेशात गुंतवणूक करण्यास कशी मदत करत आहे, ते सांगितले. Indians HNWIs (ज्यांची अर्थिक बाजारात 10 लाख डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती आहे) त्यांना या धोरणबदलामुळे चांगला लाभ झाला आहे. त्यामुळे अनेक Indians HNWIs नी परदेशात गुंतवणूक करणं सुरु केलं आहे.
अजमेरा यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यापासून भारतीय नागरिकांच्या जागतिक उत्पन्नावर कर (Tax) वाढवण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार, परदेशात वास्तव्य करणाऱ्या ज्या भारतीयांचे उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक आहे किंवा त्यापेक्षा जास्त फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit)आहेत, आणि जर ते अन्य देशांमध्ये कर भरत नसतील तर त्यांना कर भरावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय श्रीमंत त्यांच्या संपत्तीचे अधिक प्रभावीपणे वैविध्यकरण करीत आहे.
गुंतवणूकीनुसार नागरिकत्व
कोणत्याही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेण्याचा वेगवान, प्रभावी प्रयत्न करण्याचा मार्ग म्हणजे गुंतवणूक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या देशाचे नागरिकत्व घेणे. कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक करा आणि नागरिकत्व घ्या, असा नियमच परदेशांमध्ये आहे. प्रत्येक देशांसाठी ही रक्कम वेगवेगळी आहे.
भारतीय श्रीमंतांची कॅरेबियन देशांना पसंती
भारतीय श्रीमंत लोक कॅरेबियन देशांना (Caribbean Countries)विशेष पसंती देतात. विषेशतः डोमनिका सारखे देश हे सुरक्षित आश्रयस्थान समजले जातात. सेंट किटस ऍण्ड नेव्हीसचे उपक्रम भारतीयांना विशेष आकर्षित करतात. अमेरिकी डॉलरची स्थिरता येथे गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहे. तसेच या देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास आहे,त्यामुळे अनेक श्रीमंत या गोष्टींकडे आकर्षित होतात. परंतु, विशेष करुन महामारीच्या काळात या देशांमध्ये वास्तव्य करणे अधिक फायद्याचे ठरत असल्याचं दिसून आलं आहे.
परदेशातून येणं-जाणं सोपं
सीएस ग्लोबल पार्टनर्सचे पॉल सिंह याबाबत म्हणाले, कॅरेबियन बेटांवर श्रीमंत लोक आपल्या कुटुंबियांना चांगल्या जीवनशैलीचा अनुभव देत आहेत. तसेच येथून अमेरिका किंवा ब्रिटनला जाणे-येणे अधिक सोपं आहे. जगातील वाढत्या निर्बंधांमध्ये कॅरेबियन नागरिकत्व सर्वत्र प्रवास करण्यासाठी सोपा मार्ग ठरत आहे. त्यामुळे भारतातील उच्च वर्गातील लोक विदेशात वास्तव्य करण्यावर भर देत आहेत. काही प्रमाणात कोरोनापासून सुरक्षितता, परदेशांमध्ये प्रवास करणं सोपं, करामध्ये सवलत, प्रवासात सवलत, उद्योग-व्यवसायाच्या संधी या बाबी भारतातील श्रीमंतांना या देशांकडे आकर्षित करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus