गाजा शहरावर झालेल्या हवाई हल्ल्यात 6 वर्षीय Suzy Eshkuntana ला साठी राबवण्यात आलेल्या बचाब मोहिमेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मुलगी ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडली होती.
रविवारी झालेल्या हवाई हल्ल्यात या मुलीचे घर उद्ध्वस्त झाले होते. या हल्ल्यात मुलीचे चार भाऊ-बहीण मारले गेले. तिच्या आईचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. मात्र, सुजीला सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
ढिगाऱ्याखालून मुलीला बाहेर काढून एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्या सर्व मुलांमध्ये आता एकमेब जिवंत असलेल्या मुलीला पाहून तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खूप वेळापासून मुलगी ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. अचानक काही लोकांना खालून मुलीचा आरडा-ओरडा ऐकू आला. त्यानंतर सगळ्यांनी मुलीला सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. काही लोकांनी ऑक्सिजन सिलेंडरही सोबत आणले होते.
दरम्यान, हवाई हल्ल्यात आत्तापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 10 मुलांचाही समावेश आहे. दुर्घटनेत आपल्या पूर्ण परिवाराला गमावलेल्या वडिलांना आता तिच्यामुळं काहीसा आधार मिळाला आहे.