नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी भूकंपाच्या धक्क्याने मोठ्या इमारती कोसळल्या. आतापर्यंत 162 जणांच्या मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.6 इतकी होती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत बाहेर काढण्यासाठी बचाव कर्मचारी मंगळवारी घटनास्थळी पोहोचले आहेत. भूकंपाची ही घटना इंडोनेशियाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रांतातील पर्वतीय भागातील सियांजूर शहराजवळ घडली. सोमवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले आणि त्यांना घरे सोडून रस्त्यावर धावावे लागले. भूकंपामुळे इमारती कोसळल्या. सियांजूर येथील रुग्णालयाची पार्किंग रात्रभर पीडितांनी भरलेली होती. काहींवर तात्पुरत्या तंबूत उपचार करण्यात आले. इतरांना फुटपाथवर ड्रिप लावण्यात आली. तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार केले.
गर्दीच्या हॉस्पिटलच्या पार्किंग परिसरात उपचार घेत असलेल्या 48 वर्षीय कुकूने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, अचानक झालेल्या धक्क्यात इमारत कोसळली आणि सर्व काही कोसळले. मी चिरडलो. माझी दोन मुलं वाचली, मी कसातरी दोघांना बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं. एक अद्याप बेपत्ता आहे. यावेळी कुकूच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.
तर राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्ते डेडी प्रसेत्यो यांनी अंतरा स्टेट न्यूज एजेंसीला सांगितले की, शेकडो पोलीस अधिकारी मंगळवारी सकाळी बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले होते. आज मुख्य काम फक्त पीडितांना ढिगाऱ्यातून बाहेर काढणे आहे. तसेच पश्चिम जावाचे गव्हर्नर रिडवान कामिल यांनी सांगितले की, सोमवारच्या भूकंपात किमान 162 लोकांचा मृत्यू झाला, ज्यापैकी अनेक मुले होती आणि 300 हून अधिक जखमी झाले. जखमी आणि मृतांचा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय आपत्ती एजन्सी (बीएनपीबी) ने सांगितले की त्यांनी 62 मृत्यूची पुष्टी केली आहे, परंतु अतिरिक्त 100 बळींची पडताळणी नाही केली. मंगळवारी अधिकारी कुगेनांग परिसरात पोहोचण्याचे काम करत होते. येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
राजधानी जकार्ता येथे भूकंपाचे धक्के सुमारे 75 किमी (45 मैल) दूर जाणवले, असे बीएनपीबीने म्हटले आहे. किमान 2,200 घरांचे नुकसान झाले आणि 5,000 हून अधिक लोक विस्थापित झाले. इंडोनेशियामध्ये विनाशकारी भूकंपांचा इतिहास आहे. 2004 मध्ये, उत्तर इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर 9.1 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे 14 देश प्रभावित झाले. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर 226,000 लोक मारले गेले, त्यापैकी निम्म्याहून अधिक इंडोनेशियन होते.