वुहान, 10 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसनं चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगात दहशत पसरवली आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 904 जण दगावले आहेत. याआधी चीन सरकारला चेतावणी देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाला होता. आता कोरोना व्हायरसचे सत्य सर्व जगासमोर आणणारा एका पत्रकार बेपत्ता झाला आहे. चेन क्यूइशी असे या पत्रकाराचं नाव असून गुरुवारी (6 फेब्रुवारीपासून) ते बेपत्ता आहेत. क्यूइशी पहिल्यांदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी सोशल मीडियाच्या मदतीने कोरोना व्हायरसचं रिपोर्टिंग केले. क्यूइशी पत्रकारीतेबरोबरच एक मानवाधिकार कार्यकर्ताही आहेत. क्यूइशी यांनी शोध पत्रकारिता (investigative journalism) करत कोरोना व्हायरसचे सत्य जगासमोर आणले. यासंदर्भात अनेक व्हिडीओ त्यांनी युट्युबवर शेअर केले होते. मात्र चीन सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आता कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्यानंतर क्यूइशी यांचे अचानक गायब होणे, संशयास्पद वाटू लागले आहे. क्यूइशी यांच्या कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, ते आपल्या मित्रांसोबत गुरुवारी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाहीत.
陈秋实妈妈呼吁网友寻找秋实下落!陈秋实昨天说要去方舱医院,从晚上七八点到凌晨两点都处于失联状态。#WuhanCoronavirus #Wuhan #WuhanChina pic.twitter.com/FtrGjr495H
— 陈秋实 Chen Qiushi (@chenqiushi404) February 6, 2020
क्यूइशी बेपत्ता असल्याचे त्यांच्या आईने ट्विटरवरून सांगितले. क्यूइशी यांच्या आईने ट्विटर अकाऊंटला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी, “मी क्यूइशी याची आई आहे. कृपया ऑनलाइन मित्र आणि खास करुन वुहानमध्ये आहेत त्यांनी क्यूइशी याचा शोध घेण्यात मला मदत करा”, असी विनंती केली आहे. क्यूइशी यांच्या मित्रांनी त्यांच्या बेपत्ता होण्यामागे प्रशासनाचा हात असल्याचे सांगितले आहे.
मृत्यांच्या संख्येत वाढ चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 904 जण दगावले आहेत. अधिकृत आकडा एफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोना व्हायरसची 40 हजार रुग्णांना लागण झाली आहे. रविवारी चीनच्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मृतांची संख्या 803 वर पोहोचली होती. ही संख्या 2002-2003 साली पसरलेल्या एसएआरएस (SARS) या विषाणूंच्या मृतांपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर ही संख्या सर्वाधिक मानली जात होती. तीव्र श्वसन सिंड्रोममुळे 2002-2003 साली 747 लोकांचा मृत्यू झाला होता. हुबेईच्या आरोग्य विभागानेही आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये मध्य प्रातांतील आणखी 2,177 नव्या प्रकरणांची पुष्टी केली आहे. आता संपूर्ण चीनमध्ये 36,690 हून अधिक पुष्टी केलेली प्रकरणे आहेत.