नवी दिल्ली, 1 जुलै: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पुरुषांप्रमाणेच महिलांना एकापेक्षा जास्त विवाह (Multiple Marriages Right to Woman) करण्याची कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे इथे समाजात दोन गट पडले आहेत. काही लोक स्त्रियांना बहुविवाहाचा अधिकार मिळण्याच्या बाजूने आहेत, तर बरेच लोक याविरूद्ध आहेत. या नव्या कायद्यामुळे सामाजिक व्यवस्था ढासळून जाईल अशी भीती विरोधी गटातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. तसंच यामुळे अनेक पुरुषांशी विवाह करणारी महिला पुरुषांनी तिचं आडनाव लावण्याची अपेक्षा करेल, असा युक्तिवाददेखील केला जात आहे. घटनात्मक समानतेसाठी पुढाकार - दक्षिण आफ्रिकेची घटना जगातील सर्वात आधुनिक घटनांपैकी एक मानली जाते. इथे समलिंगी विवाह आणि पुरुषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याला कायदेशीर मान्यता आहे. घटनेत स्त्रियांनाही समान हक्क मिळण्याच्या दृष्टीने सध्याच्या सरकारने हा प्रस्ताव मांडला आहे. त्याला मंजुरी मिळाली तर मॅरेज अॅक्टनुसार महिलांनाही कायदेशीररित्या एकापेक्षा जास्त विवाह करून अनेक पतींसमवेत संसार करता येईल. गोऱ्या लोकांची सत्ता संपल्यानंतर विवाह कायद्यातही बदल - 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या लोकांच्या साम्राज्याचा शेवट झाला आणि त्यानंतर या देशातील मॅरेज अॅक्टमध्ये (Marriage Act) बरेच मोठे बदल झाले. हे बदल आफ्रिकन रितीरिवाजानुसार केले गेले. या दस्तऐवजाला तिथं ग्रीन पेपर (Green Paper) म्हणतात. आता ग्रीन पेपरमध्ये महिलांनाही बहुपतीत्व देण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाने (Home Ministry) मांडला आहे. मानवी हक्क संघटनाही यात सरकारला सहकार्य करत आहेत. विरोधकांचे वेगवेगळे युक्तिवाद - या प्रस्तावाला काही लोकांचा विरोध असून ते वेगवेगळे युक्तीवाद मांडत आहेत. यामुळे डीएनए चाचणी घेतल्याखेरीज मुलाचा खरा पिता कोण आहे हे समजणं कठीण होईल. यानंतर फक्त महिलाच घर चालवतील आणि स्त्रीच कुटूंब प्रमुख म्हणून ओळखली जाईल. पतीलाच पत्नीचं आडनाव लावावं लागेल असे ते युक्तिवाद आहेत. याशिवाय अन्य सुधारणाही अपेक्षित - महिलांना बहुपतीत्वाचा हक्क देण्याव्यतिरिक्त, ग्रीन पेपरमध्ये इतरही अनेक दुरुस्त्या करण्यात येण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, अल्पवयीन मुलांना विवाहाचा अधिकार. सेक्स चेंज करून समान लिंगी बनलेल्या जोडप्यांना घटस्फोट न घेता लग्न कायम ठेवण्याचा अधिकार देणं अशा सुधारणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तिबेटमध्ये आहे अशी प्रथा - महिलांच्या बहुविवाहावरून दक्षिण आफ्रिकेत गदारोळ माजला असला तरीही जगातील बर्याच भागात याला मान्यता आहे. तिबेट (Tibet) या छोट्याशा देशातील बर्याच समुदायांमध्ये ही प्रथा आहे. पत्नी सामायिक करण्याची प्रथा म्हणून ही प्रथा ओळखली जाते. यामुळे कुटुंबातील दोन किंवा तीन भावांना एकच पत्नी असते. मालमत्तेचे, जमिनीचे अनेक तुकडे होऊ नयेत या हेतूनं एकाच घरातील एकापेक्षा जास्त भावांमध्ये एकच पत्नी असण्याचा रिवाज पाळला जातो. यामुळे संपत्तीची वाटणी करण्याचा त्रासही कमी झाला. तसंच यामुळे एखादा भाऊ काही कारणास्तव दूरच्या प्रवासाला गेला असेल तर पत्नी आणि जमीन सांभाळण्यासाठी घरी एक पुरुष सदस्य असतो. इथल्या लग्नाची मात्र एक विचित्र परंपरा आहे. कुटुंबातील दोन ते तीन भावांची पत्नी असणाऱ्या स्त्रीचा विवाह होताना मात्र सर्व धार्मिक विधी मात्र फक्त मोठ्या भावाबरोबरच केले जातात. नंतर होणाऱ्या रितीरीवाजांमध्येही ती मोठ्या भावासोबत बसते, घरात मात्र तिचे सर्व भावांशी संबंध असतात. मुलाच्या जैविक वडिलांविषयी वादविवाद नाही - अशा लग्नापासून जन्माला आलेल्या मुलाचे जैविक पिता कोण याबाबत कोणाही भावाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला माहिती नसते. त्यामुळे सर्व मुलांना सर्व वडिलांचं प्रेम मिळतं. मुलाचा जैविक पिता कोण आहे हे माहिती असलं तरीही ही गोष्ट सांगितली जात नाही आणि मुलाला प्रत्येकाकडून समान प्रेम मिळतं. बहुपतीत्वाची प्रथा नष्ट होतेय - 1959 च्या सुमारास जेव्हा तिबेटमध्ये राजकीय बदल झाले तेव्हा जमीन अधिकार आणि कर प्रणालीदेखील नवीन करण्यात आली. ओहायो विद्यापीठातील तिबेटचे तज्ज्ञ प्रोफेसर मेलव्हिन गोल्डस्टीन यांच्या म्हणण्यानुसार, याच काळात देशातील बहुपतीत्वाची प्रथा नष्ट होण्याची सुरुवात झाली. तिबेटच्या बर्याच ग्रामीण समुदायांमध्ये ही प्रथा अजूनही चालू आहे. व्हेनेझुएला आणि ब्राझीलमध्येही काही ठिकाणी ही प्रथा आहे. चीनमध्येही चर्चा सुरू - लैंगिक असमानतेमुळे चीनमध्येही (China) अनेकदा बहुपतीत्वाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत चर्चा झाली आहे. चीनमध्ये स्त्री-पुरुष प्रमाण इतकं व्यस्त आहे की तिथं लग्न करण्याची इच्छा असूनही पुरुषांना मुली मिळत नाहीत. 118 मुलांमध्ये 100 मुली असं प्रमाण आहे. अशा परिस्थितीत इथल्या बौद्धिक समाजातील लोकांनी तिबेटचा आधार देत स्त्रियांना एकापेक्षा जास्त पती करण्याची परवानगी देण्याही शिफारस केली होती. मात्र याला प्रचंड विरोध झाल्यानं ही चर्चा तिथंच थांबली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.