लंडन, 8 मार्च : ब्रिटनच्या राजघराण्याची सून आणि प्रिन्स हॅरी
(Prince Harry) यांची बायको मेगन मर्केल
(Meghan Markle) यांनी एका मुलाखतीमध्ये राजघराण्याची अनेक गुपितं उघड केली आहेत. प्रसिद्ध टीव्ही अमेरिकन होस्ट ओपरा विन्फ्रे
(Oprah Winfrey) यांना मर्केल यांनी मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी ब्रिटीश राजसंस्था खोटारडी असून शाही परिवारानं जाणीवपूर्वक आपली इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला.
“आमच्या मुलाचा रंग कसा असेल याची शाही परिवाराला चिंता होती. आपला मुलगा आर्चीच्या त्वचेचा रंग काळा असेल अशी भीती या परिवाराला होती. त्यामुळे मुलाला ते प्रिन्स घोषित करण्यास तयार नव्हते,’’ असा दावा आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या मेगन यांनी केला आहे.
प्रिन्स विल्यम यांची पत्नी केट मिडल्टन यांच्याशी आपला वाद झाल्याची बातमी देखील खोटी आहे, असे मर्केल यांनी सांगितले. “केट यांना फ्लॉवर गर्लचे कपडे आवडले नव्हते. त्यामुळे मला रडू आले. तो विचित्र प्रसंग होता. या घटनेनंतर त्यांनी मला एक बुके पाठवला. त्यामध्ये एक माफी मागणारी नोट देखील होती. ही गोष्ट मी केट यांना कमीपणा दाखवण्यासाठी सांगत नाही. त्या चांगल्या व्यक्ती आहेत,’’ असं मेगन यांनी स्पष्ट केले.
‘आत्महत्येचा विचार आला होता’
शाही परिवारासोबत राहत असताना आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, असा धक्कादायक गौप्यस्फोट मेगन यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे. “मी शाही परिवारावर विश्वास ठेवला ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला एकटेपणा जाणवत होता. माझ्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. मला मित्रांसोबत लंचसाठी बाहेर जाण्याची परवानगी देखील नव्हती,’ असे त्यांनी सांगितले.
( वाचा : राफेल लढाऊ विमान बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू )
‘पूर्वीच केले होते लग्न’
प्रिन्स हॅरी सोबत झालेल्या सार्वजनिक लग्नाच्या तीन दिवस आधीच आम्ही लग्न केले होते, असेही मेगन यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ‘ते लग्न जगाला दाखवण्यासाठी होते. तो आमचा दिवस नव्हता. हे मला आणि हॅरीला चांगले माहिती होते,’ असेही मेगन यांनी म्हंटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.