मुंबई, 23 जानेवारी : कोरोना व्हायरस (Corona Virus) या सध्याच्या मोठ्या संकटातून जगाची सुटका करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. भारतानं यापूर्वीच शेजारच्या देशांना कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine) पाठवलं आहे. त्यापाठोपाठ भारतानं आता ब्राझीलला (Brazil) देखील हे औषध पाठवलं आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जेअर बोलसोनारो (Jair Bolsonaro) हे यामुळे चांगलेच आनंदी झाले आहेत. त्यांनी रामायाणातील संजीवनी औषध घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. काय केलं ट्विट? ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो यांनी त्यांच्या ट्वीटची सुरुवात नमस्कार, नरेंद्र मोदी अशी केली आहे. ‘जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.’ असं त्यांनी ट्वीट केलं आहे. हे ट्विट प्रामुख्यानं ब्राझीलच्या स्थानिक भाषेतील असलं तरी त्याची सुरुवातीला नमस्कार आणि शेवटी धन्यवाद हा भारतीय भाषेतील शब्द त्यांनी वापरला आहे.
मोदींचाही प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोलसोनारो यांच्या ट्वीटला उत्तर दिलं आहे. ‘कोव्हिड महामारीविरुद्ध एकत्र लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवेबाबत भारत तुम्हाला अधिक मजबुतीनं सहकार्य करेल, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
The honour is ours, President @jairbolsonaro to be a trusted partner of Brazil in fighting the Covid-19 pandemic together. We will continue to strengthen our cooperation on healthcare. https://t.co/0iHTO05PoM
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021
भारत सरकारनं आतापर्यंत बांगलादेशात 20 लाख तर नेपाळमध्ये 10 लाख कोरोना व्हॅक्सिनचे डोस पाठवले आहेत. तर भूतान आणि मालदीव यांना अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख डोस पाठवून भारतानं मदत केली आहे. भारतीय व्हॅक्सिनला जगभर जबरदस्त डिमांड आहे. जवळपास 92 देशांनी भारताकडून कोरोना व्हॅक्सिन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.