ब्रासिलिया, 07 जानेवारी : एका तरुणीनं जुळ्या मुलांना जन्म दिला. पण धक्कादायक बाब म्हणजे या जुळ्या मुलांचे वडील एक नाही तर दोन आहेत. या दोन मुलांच्या डीएनए अहवालात ही गोष्ट समोर आली आहे. ब्राझीलमधील मिनेरिओस येथील एका 19 वर्षीय तरुणीनं जुळ्या मुलांना जन्म दिला असून या मुलांचे वडील मात्र वेगवेगळे आहेत. अशी घटना लाखात एखादी घडू शकते, असं तज्ज्ञांच मत आहे. संबंधित तरुणीनं सांगितलं की, ‘मला माझ्या मुलांचे वडिल कोण आहेत, हे जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी मी पॅटर्निटी टेस्ट म्हणजे पितृत्व चाचणी केली होती.’ दरम्यान, एमनिओसेंटेसिस आणि सीव्हीएस या पॅटर्निटी टेस्टसाठी केल्या जाणाऱ्या दोन प्रसूतीपूर्व टेस्ट आहेत. या चाचण्यांमुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो. नॉन-इन्व्हेजिव्ह प्रसवपूर्व पितृत्व चाचणीसाठी, गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत आईचे रक्त घेतले जाते, आणि नंतर गर्भाच्या डीएनएची प्रयोगशाळेत चाचणी केली जाते. हेही वाचा : सहा वर्षांच्या विद्यार्थ्यानं केला शिक्षिकेवर गोळीबार, धक्कादायक कारण समोर तरुणीला मुलांच्या वडिलांबद्दल होती शंका रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलमधील संबंधित तरुणीला तिच्या मुलांचे वडील कोण आहेत याबाबत शंका होती. त्यामुळे तिच्या मुलांचे वडील आहेत, असं तिला वाटत होतं त्या पुरुषाची तिनं डीएनए चाचणी केली. पण चाचणीनंतर केवळ एका मुलाची डीएनए चाचणी पॉझिटिव्ह आली, तर दुसऱ्या मुलाची डीएनए चाचणी निगेटिव्ह आल्याचे आढळून आले. त्यावेळी संबंधित तरुणीला आठवलं की, तिने त्याच दिवशी दुसर्या पुरुषासोबतसुद्धा सेक्स केलं होतं. त्यानंतर संबंधित दुसऱ्या पुरुषाची डीएनए चाचणी केली असता, तो तिच्या दुसऱ्या मुलाचा बाप असल्याचं समोर आलं. काय सांगतं विज्ञान? वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, या प्रकरणाला शास्त्रज्ञांनी ‘हेटेरो पेरेंटल सुपरफेकंडेशन’ असं म्हटलं आहे. यामध्ये एका मासिक पाळी चक्रादरम्यान दुसऱ्या अंडपेशीची निर्मिती होते. संभोगादरम्यान ही अंडपेशी दुसऱ्या पुरुषाच्या शुक्राणूसोबत मिसळते तेव्हा अशी घटना घडते. अशी घटना प्रथम आर्चरमध्ये 1810 ला झाली होती. मानवांमध्ये हे फार क्वचितच घडतं. हेटेरो पेरेंटल हे कुत्रं, मांजरं आणि गायींमध्ये सामान्य आहे, असं द गार्डियनच्या अहवालात म्हटलं आहे. हेही वाचा : तरुणीने जॉब सोडताच स्वत:च्याच श्रद्धांजलीचा आखला प्लान, कारण ऐकून चक्रावाल! यामध्ये दोन शक्यता असू शकतात. पहिली म्हणजे, महिलांच्या योनीत एकाचवेळी दोन अंडपेशी असू शकतात. शुक्राणू बरेच दिवस जगू शकत असल्यानं, असं होऊ शकतं की पुरुषासोबत संभोग करताना पहिली अंडपेशी सोडली जाते, आणि दुसरी ओव्हुलेशन नंतर लगेचच. दुसरी शक्यता अशी आहे की, महिलेनं एकाच मासिक पाळी चक्रादरम्यान काही दिवसांत दोन अंडीपेशी सोडल्या असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत जगात अशी केवळ 20 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. दुसरीकडे, सामान्यत: जुळ्या मुलांमध्ये एकच अंडपेशी एका शुक्राणू द्वारे दोन ठिकाणी फलित होते. त्यामुळे अशा जुळ्या मुलांचे वडील वेगळं असणं अशक्य असतं. त्यामुळे ब्राझीलमधील या प्रकारानं अनेकांना चक्रावून सोडलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.