मुंबई, 31 जानेवारी : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यातून बाहेर पडण्याचा जग सध्या प्रयत्न करत आहे. जगभरात या व्हायरसच्या पेशंट्सची संख्या ही 10 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तर, 22 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. भारतासह अनेक देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर काही देश अजूनही लशीची प्रतीक्षा करत आहेत. त्याचवेळी भविष्यात येणारी महामारी ही कोरोनापेक्षा 10 पट भयंकर असेल, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सह संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिला आहे.
काय म्हणाले बिल गेट्स?
‘सर्व देशांनी कोरोना महामारीपासून (Corona Pandemic) धडा शिकला पाहिजे’, असं मत गेट्स यांनी व्यक्त केलं. ते जर्मन मीडियाशी बोलत होते. “जग आगामी महामारीसाठी सज्ज नाही. सर्व देशांमधील सरकारनं आपल्या नागरिकांचं संभाव्य महामारीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. सध्याची महामारी गंभीर आहे, पण भविष्यातील महामारी यापेक्षा 10 पट गंभीर असू शकते,’’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. ‘कोरोना व्हायरसची लागण पाच वर्षांपूर्वी झाली असती तर त्यावरील औषध इतक्या लवकर बनवणं शक्य नव्हतं,’ असा दावा गेट्स यांनी केला आहे.
ज्या संस्था आणि शास्त्रज्ञांनी कोविड व्हॅक्सिन (COVID-19 Vaccine ) बनवण्यात मदत केली त्या सर्वांची गेट्स यांनी प्रशंसा केली. जागतिक नेत्यांनी व्हॅक्सिन राष्ट्रवादापासून दूर राहावं आणि व्हॅक्सिन वितरण योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी प्रयत्न करावेत, असं त्यांनी आवाहन केलं.
काय आहे व्हॅक्सिन राष्ट्रवाद?
एखादा देश अन्य देशांच्या पूर्वी आपल्या देशातील नागरिकांना व्हॅक्सिन मिळावं यासाठी व्हॅक्सिन उत्पादकांशी करार करतो, त्याला व्हॅक्सिन राष्ट्रवाद असं म्हणतात.
व्हॅक्सिन राष्ट्रवादीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 2009 साली पसरलेल्या H1N1 फ्लू च्या काळातही हा प्रकार घडला होता. तेंव्हा या फ्लूवर व्हॅक्सिन बनवणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश होता. मात्र त्यांनी अन्य देशांना व्हॅक्सिनची निर्यात करण्यास बंदी घातली होती. तर काही श्रीमंत देशांनी व्हॅक्सिन उत्पादक कंपन्यांशी सुरुवातीलाच करार केले होते. एकट्या अमेरिकेनं 6 लाख डोस खरेदी करण्याबाबत करार केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bill gates, Coronavirus